ब्रिटीश सरकारच्या वेबसाईटसह माध्यमे, ई-कॉमर्स व सोशल नेटवर्किंगशी संबंधित अनेक वेबसाईट ‘ऑफलाईन’

लंडन/वॉशिंग्टन – ब्रिटनच्या सरकारची वेबसाईट असलेल्या ‘जिओव्ही डॉट युके’सह प्रसारमाध्यमे, ई-कॉमर्स, मनोरंजन व सोशल नेटवर्किंगशी संबंधित अनेक वेबसाईट्स मंगळवारी सकाळी ‘ऑफलाईन’ झाल्या होत्या. अमेरिकेतील ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ सेवा पुरविणारी कंपनी ‘फास्टली’च्या नेटवर्कमध्ये समस्या उद्भवल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिका व युरोपमध्ये ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ल्यांचे प्रमाण वाढले असतानाच ही घटना घडल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

Advertisement

ब्रिटीश सरकारच्या वेबसाईटसह माध्यमे, ई-कॉमर्स व सोशल नेटवर्किंगशी संबंधित अनेक वेबसाईट ‘ऑफलाईन’मंगळवारी सकाळी ब्रिटनच्या ‘जिओव्ही डॉट युके’सह अनेक वेबसाईट्स एकपाठोपाठ एक ऑफलाईन जाण्यास सुरुवात झाली. वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांना सातत्याने ‘एरर’चा संदेश दाखविण्यात येत होता. ब्रिटनच्या सरकारी वेबसाईटसह बीबीसी, गार्डियन, इंडिपेंडंट, फायनान्शिअल टाईम्स, द न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, वॉशिंग्टन पोस्ट व वॉल स्ट्रीट जर्नल या माध्यमक्षेत्रातील वेबसाईटही बंद पडल्याचे दाखविण्यात येत होते.

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉन, ईबे, शॉपिफाय तसेच सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील ‘रेडिट’, ट्विटर, विमिओ, फॅनडम, कोरा यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील शेकडो वेबसाईट्स ‘ऑफलाईन’ झाल्याचे समोर आले. जगभरात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वेबसाईट्स बंद पडण्यामागे अमेरिकेतील ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ सेवा पुरविणारी कंपनी ‘फास्टली’मध्ये निर्माण झालेली समस्या कारणीभूत ठरली.ब्रिटीश सरकारच्या वेबसाईटसह माध्यमे, ई-कॉमर्स व सोशल नेटवर्किंगशी संबंधित अनेक वेबसाईट ‘ऑफलाईन’

जगातील अनेक आघाडीच्या वेबसाईट्स ‘फास्टली’ कंपनीच्या ‘एज क्लाऊड प्लॅटफॉर्म नेटवर्क’चा वापर करतात. या प्लॅटफॉर्मवर एखाद्या वेबसाईटवर दिसणार्‍या माहिती तसेच प्रतिमांपासून सायबरसुरक्षा पुरविणार्‍या ‘फायरवॉल’चा समावेश आहे. मंगळवारी कंपनीच्या ‘कंटेट डिलिव्हरी नेटवर्क’मध्ये (सीडीएन) मोठे तांत्रिक दोष निर्माण झाले. हे दोष उद्भवण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. वेबसाईट्स बंद पडण्यास सुरुवात झाल्यानंतर कंपनीकडून ही माहिती जाहीर करण्यात आली.

काही तासांनंतर कंपनीने तांत्रिक दोष दूर झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अनेक वेबसाईट ‘ऑनलाईन’ आल्या असल्या तरी त्यांची गती मंदावली आहे. काही वेबसाईट्सना अजूनही एरर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका कंपनीच्या सेवेत दोष निर्माण झाल्याने जगभरातील इंटरनेटला फटका बसण्याची गेल्या आठ महिन्यांमधील ही तिसरी वेळ आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ‘अ‍ॅमेझॉन’ तसेच ‘गुगल’च्या नेटवर्कमध्ये दोष निर्माण झाल्याने त्यांच्या सेवेचा वापर करणार्‍या अनेक वेबसाईट्सना फटका बसला होता.

leave a reply