अलिप्ततावादाचा काळ संपला; भारताला जोखीम स्वीकारावी लागेल

- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

नवी दिल्ली – ‘अलिप्ततावादाचे युग आता संपले आहे. ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्याचवेळी एक किंवा दोन शक्तीशाली राष्ट्रांशी केंद्रित व्यवस्थेचाही अंत झाला आहे’, असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी म्हटले आहे. ‘पण भारताबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारताने मोठ्या मुद्द्यांवर अधिकाधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भारताला अधिक जोखीम घेणे आवश्यक बनले आहे’, असेही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हटले आहे. असे असले तरी भारत कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही, असेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अधोरेखित केले.

Indiaचीनबरोबरील तणाव आणि अमेरिकेशी बळकट होणारे धोरणात्मक संबंध या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अतिशय मह्त्वाचे ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यातून एकाच वेळी चीन तसेच अमेरिकेला संदेश दिल्याचे म्हटले जात आहे. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र होते आणि स्वतंत्र राहील, हा संदेश यामध्ये आहेच. पण त्याचवेळी भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही काळात मजबूत झाले असले तरी भारताने डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवलेला नाही. देशाच्या हिताला अनुसरून भारत आवश्यक जोखीम पत्करण्यास सज्ज असल्याचे संकेत यातून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सध्याचे जग अधिक आव्हानात्मक झाले आहे. गेल्या चाळीस वर्षात मोठा असमतोल दिसून आला होता. त्यामध्ये आता बदल झाला आहे. तसेच देशांमध्ये एकमेकांवरील निर्भरता वाढली आहे. त्याचवेळी प्रभाव, शक्ती, मुत्सद्देगिरीची समीकरणे बदलली आहेत, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. सध्या आपण बहुध्रुवीय जगाच्या दिशेने प्रवास करीत आहोत. जी-२० देश आता जास्त महत्वपूर्ण भूमिका बजाविण्याच्या स्थितीत आहेत, असे जयशंकर यांनी अधोरेखित केले.

India-America-Chinaअलिप्ततावाद हा विशिष्ट काळासाठी होता. ५०-६० च्या दशकात भारत कमकुवत होता. पण आज भारताकडे अपेक्षेने पहिले जात आहे. त्यामुळे भारत दर्शक बनून राहणार नाही. सागरी सुरक्षा, दहशतवाद, कनेक्टिव्हिटी यासारख्या मुद्यांवर भारताने अधिक सक्रिय भूमिका स्वीकारावी, अशी अपेक्षा भारताकडून केली जाते. त्यामुळे भारताला जोखीम स्वीकारणे आवश्यक बनले आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले.

मुक्त व्यापारी करारातून भारताच्या अर्थव्यवस्थेला विशेष लाभ झाला नसल्याचे, एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. जगाशी जोडलेले राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्यामुळे मुक्त व्यापारी करार हा एकच मार्ग नाही. भारताला जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. यातून अर्थव्यवस्थेला अधिक फायदा होईल, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कोरोनाच्या साथीनंतर जग अधिक संरक्षणवादी अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा दावा केला.

leave a reply