भारतीय नौदलातील ‘पी८आय’ विमानांच्या ताफ्यात वाढ होणार

Indian-Navyनवी दिल्ली – पाणबुडीचा वेध घेणारी तसेच इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची सोय असलेली चार ‘पी८आय’ विमाने पुढच्या वर्षी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील. अमेरिकेबरोबर झालेल्या करारांच्या पार्श्वभूमीवर ही लांब पल्ल्याची टेहळणी विमाने भारतीय नौदलात सामील होणार आहेत. हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या हालचाली वाढत असताना, या विमानांचा भारतीय नौदलातील समावेश महत्त्वाचा ठरू शकतो.

भारत आणि अमेरिकेत झालेल्या अब्जावधी डॉलर्सच्या करारांतर्गत बोईंग कंपनी भारताला ‘पी८आय – पोसायडन’ विमाने पुरवित आहे. प्रगत रडार यंत्रणेने सज्ज असलेली आठ पोसायडन विमाने २०१६ सालीच भारतीय नौदलात तैनात करण्यात आली आहेत. गेली चार वर्षे अरबी समुद्रापासून हिंदी महासागर क्षेत्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत या विमानांची गस्त सुरू आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या कारारानुसार चार पोसायडन विमानांचा ताफा पुढच्या वर्षी भारतात दाखल होईल. तर उर्वरित सहा विमाने त्यापुढील वर्षभरात नौदलात सहभागी होणार आहेत.

भारतीय सैनिकांनी लडाखमधील चीनचे डावपेच यशस्वीरित्या उधळून लावल्यानंतर अस्वस्थ झालेला चीन भारतावर दडपण टाकण्यासाठी हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या हालचाली वाढविल, असे इशारे लष्करी विश्लेषक देत आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात विनाशिका, पाणबुड्या तसेच छोट्या जहाजांचे फ्लोटीला घुसवून चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करील, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर, पोसायडन विमानांचा भारतीय नौदलातील समावेश औचित्यपूर्ण ठरत आहे. त्यातच ही विमाने भारतीय नौदलाबरोबरच लडाखमध्ये तैनात भारतीय लष्कराच्या गरजाही पूर्ण करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Indian-Navyत्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाने रणगाड्यांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘माईन प्लॉ’च्या खरेदीसाठी ‘भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड’शी (बीईएमएल) ५५७ कोटी रुपयांचा करार केला आहे. ‘माईन प्लॉ’ हे भूसुरुंग शोधून ते जमिनीतून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. लष्कराच्या ‘टी-९०’ रणगाड्यावर हे ‘माईन प्लॉ’ बसवण्यात येतील. भारत-चीन तणावानांतर सीमेवर ‘टी-९०’ रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. या रणगाड्यांची निर्मिती देशात करण्यात येणार असून ५० टक्के भाग स्वदेशी असतील. माईन प्लॉमुळे लष्कारची मोठी हानी टाळण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply