अरब देशांमध्ये ज्यूधर्मियांच्या सांस्कृतिक संघटनेची स्थापना

सांस्कृतिक संघटनाजेरूसलेम – पर्शियन आखातातील सहा अरब देशांमध्ये वास्तव करणार्‍या ज्यूधर्मियांसाठी पहिली सांस्कृतिक संघटना उभारण्यात आली आहे. या संघटनेमुळे गेली कित्येक दशके अरब देशांमध्ये विखुरलेले ज्यूधर्मिय एकमेकांशी जोडले जातील, असा विश्‍वास या संघटनेचे संस्थापक व्यक्त करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी इस्रायल आणि अरब देशांमध्ये पार पडलेल्या अब्राहम अकॉर्डमुळे हे शक्य झाल्याचा दावा केला जातो.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन, कुवैत, ओमान आणि कतार या अरब देशांमध्ये काही हजार ज्यूधर्मियांचे वास्तव्य आहे. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ‘असोसिएशन ऑफ गल्फ ज्यूईश कम्युनिटीज्’ (एजीजेसी) ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. दुबईस्थित ज्यूधर्मोपदेशक डॉ. एली अबादी आणि बाहरिनस्थित इब्राहिम दाऊद नोनू यांनी ‘एजीजेसी’च्या स्थापनेची घोषणा केली.

सांस्कृतिक संघटनाअरब देशांमधील ज्यूधर्मियांचे नागरी अधिकार, सन्मान आणि वारसा व ज्यूधर्मियांची आचारपद्धती यांचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य ‘एजीजेसी’ करणार आहे. यासाठी ‘बेथ दिन ऑफ अरेबिया’ उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यूधर्मियांची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती वाचविण्यासाठी देखील ‘एजीजेसी’मार्फत प्रयत्न केले जातील. याशिवाय पुढच्या काळात अरब देशांमधील ज्यूधर्मियांसाठी शैक्षणिक व्यवस्था सुरू करण्याबाबतही एजीजेसी’चा विचार सुरू असल्याची माहिती अबादी यांनी इस्रायली दैनिकाशी बोलताना दिली.

एजीजेसीमुळे अरब देशांमध्ये विखुरलेल्या ज्यूधर्मियांना सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र आणण्याचा हेतू यामागे असल्याचे अबादी यांनी सांगितले. युएई आणि बाहरिन या अरब देशांमध्ये फार आधीपासून ज्यूधर्मियांच्या संस्था कार्यरत आहेत. त्याचबरोबर या देशांमध्ये ज्यूधर्मियांनी राजनैतिक अधिकारी, व्यावसायिक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सौदी अरेबियातही छोट्या संख्येने ज्यूधर्मिय असून ते देखील आपल्या या संघटनेशी जोडले गेल्याचे अबादी यांनी सांगितले.सांस्कृतिक संघटना

सदर संघटना खासगी निधी आणि स्थानिक संस्थांच्या सहाय्याने सुरू आहे. या संघटनेसाठी राजकीय स्तरावर युएईच्या प्रशासनाने मोठे सहकार्य केल्याची तसेच यापुढेही हे सहकार्य सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती अबादी यांनी दिली. युएईने तर अबू धाबीमध्ये एकाच भूभागात सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळ उभारण्याची घोषणा केली असून यामध्ये ज्यूधर्मियांच्या सिनेगॉगचाही समावेश असणार आहे. तर स्थानिक ज्यूधर्मिय सौदी प्रशासनाच्या संपर्कात असल्याचेही अबादी म्हणाले.

अरब देशांमध्ये सांस्कृतिक संघटना उभारण्यापर्यंत आपले कार्य मर्यादित राहणार नाही. तर इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध अधिक विकसित करून सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी देखील आपली संघटना प्रयत्न करील, असे अबादी यांनी म्हटले आहे. एजीजेसी या संघटनेच्या संचलनासाठी अमेरिका, युरोप तसेच इस्रायलमधील धर्मगुरुंचेही सहाय्य घेतले जाणार आहे.

leave a reply