हॉंगकॉंगस्थित ‘ऍपल डेलि’वर झालेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायाची टीका

हॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर केलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय समुदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा वापर सुरक्षेसाठी नाही तर विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी केला जात असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी खरमरीत टीका ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. अमेरिका, युरोपिय महासंघ तसेच तैवाननेही ‘ऍपल डेलि’वर टाकलेल्या धाडीवर चिंता व्यक्त केली आहे. तैवानमधील एका संसद सदस्याने सदर कारवाई ‘रेड टेरर’चा भाग असल्याचे म्हंटले आहे.

‘ऍपल डेलि’वरगुरुवारी हॉंगकॉंगच्या तब्बल ५०० पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ‘ऍपल डेलि’ या दैनिकाच्या कार्यालयावर धाड टाकली. ‘ऍपल डेलि’ हे हॉंगकॉंगमधील उद्योजक जिम्मी लाय यांच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. जिम्मी लाय हे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांना लोकशाहीवादी आंदोलनातील सहभागावरून अटक करण्यात आली असून तुरुंगात टाकण्यात आले आहे. ‘ऍपल डेलि’ हे दैनिक हॉंगकॉंगमधील आघाडीचे लोकशाहीवादी दैनिक आहे.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने गेल्या वर्षी जबरदस्तीने लादलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा वापर करून ‘ऍपल डेलि’ला लक्ष्य केले. गुरुवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी दैनिकाची जबाबदारी असणार्‍या पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यात संपादक रायन लॉ व त्यांचे सहकारी चॅन पुई-मॅन यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान मुख्यालयातील ३८ कॉम्प्युटर ताब्यात घेण्यात आले आहेत. ‘ऍपल डेलि’शी संबंधित तीन कंपन्यांची २३ लाख डॉलर्सची मालमत्ता गोठविण्यात आल्याचीही माहिती हॉंगकॉंग पोलिसांनी दिली.

‘ऍपल डेलि’वर‘ऍपल डेलि’कडून बातम्या व लेखांचा वापर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी करण्यात येत होता, असा आरोप हॉंगकॉंग प्रशासनाकडून करण्यात आला आहे. बातम्या व संबंधित माहितीच्या माध्यमातून इतर देशांना हॉंगकॉंग तसेच चीनविरोधात निर्बंध लादण्यासाठी चिथावणी देण्यात येत होती, असाही दावा प्रशासनाने केला आहे.

अमेरिकेसह ब्रिटन, युरोपिय महासंघ व तैवानने ‘ऍपल डेलि’वरील कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे. ‘ऍपल डेलिवर टाकलेली धाड व इतर कारवाई, चीनची राजवट नॅशनल सिक्युरिटी लॉचा वापर विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी करत असल्याचे सिद्ध करणारी ठरते. ब्रिटनबरोबर केलेल्या संयुक्त निवेदनात माध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याची ग्वाही देण्यात आली होती आणि त्याचा आदर राखणे आवश्यक आहे’, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी बजावले.

‘ऍपल डेलि’वरअमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही यावर गंभीर चिंता व्यक्त करताना सदर कारवाई व त्यामागील हेतू राजकीय असल्याचे दिसून येते, असा आरोप केला आहे. युरोपिय महासंघानेही यासंदर्भात निवेदन जारी करून, ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा गैरवापर होत असल्याचा दावा केला. तैवाननेही हॉंगकॉंमधील कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. एकाधिकारशाही राबविणार्‍या राजवटीने ‘ऍपल डेलि’विरोधात युद्ध छेडले असून हॉंगकॉंमधील स्वातंत्र्याचे प्रतीक आता धोक्यात आले आहे, अशी टीका तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी केली. तैवानमधील संसद सदस्य शिऊ सिअन-चि यांनी चीनची कारवाई म्हणजे ‘रेड टेरर’ अर्थात कम्युनिस्ट राजवटीचा दहशतवाद असल्याचा ठपका ठेवला आहे.

leave a reply