अफगाणिस्तानातील माघारीच्या मुदतीवरून युरोपिय देश बायडेन यांच्यावर नाराज

युरोपिय देशवॉशिंग्टन/लंडन – 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातील बचावकार्य व सैन्यमाघार पूर्ण होऊ शकत नाही. अमेरिकेने तालिबानशी चर्चा करून ही मुदत वाढवून घ्यावी, असे आवाहन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांनी ‘जी7’च्या बैठकीत केले. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मुदतवाढी न घेण्याचे जाहीर केल्यामुळे युरोपिय देशांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला जातो. 31 ऑगस्टच्या मुदतीवर ठाम राहून बायडेन प्रशासनाने तालिबानसमोर सपशेल शरणांगती पत्करल्याची टीका पाश्‍चिमात्य माध्यमांमध्ये होऊ लागली आहे.

31 ऑगस्टपर्यंत पाश्‍चिमात्य देशांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पूर्ण करावी. यानंतर एकही परदेशी जवान अफगाणिस्तानात तैनात दिसला तर खपवून घेणार नाही, असे तालिबानने दोन दिवसांपूर्वी बजावले. पण 31 ऑगस्टपर्यंत आपल्या नागरिकांना आणि अफगाणींचे बचावकार्य तसेच त्यानंतर आपल्या जवानांची माघार शक्य नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते. नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी देखील काबुल विमानतळावरील गोंधळाचा दाखला देऊन 31 ऑगस्टची मुदत पुरेशी पडणार नसल्याचे म्हटले होते.

युरोपिय देशतालिबानबरोबर दोहा करार करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने बचावकार्य व सैन्यमाघारीसाठी आणखी काही दिवसांची सवलत घ्यावी, अशी मागणी जॉन्सन यांनी केली होती. यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मंगळवारी ‘जी7’ देशांची तातडीची बैठक बोलाविली. या बैठकीतही इतर सदस्य देशांनी अमेरिकेकडे मुदतवाढीची मागणी केली. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन 31 ऑगस्टच्या मुदतीवरच ठाम राहिले. अमेरिकेने आत्तापर्यंत 70 हजारांहून अधिक जणांना मायदेशी परत आणल्याचा दावा करून 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे बचावकार्य व माघार पूर्ण होईल, असा दावा बायडेन यांनी केला.

गेली वीस वर्षे अफगाणिस्तानातील दहशतवाद विरोधी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेच्या या भूमिकेवर युरोपिय देशांनी उघड नाराजी व्यक्त केली नाही. पण, अफगाण माघारीबाबत बायडेन यांनी स्वीकारलेल्या भूमिकेबाबत अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये उघड नाराजी असल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. या माघारीच्या निर्णयाबरोबर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युरोपिय देशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका ब्रिटनच्या आघाडीच्या दैनिकाने केली.

दरम्यान, काबुल विमानतळाबाहेरील सुरक्षेचा ताबा घेणाऱ्या तालिबानच्या दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकाला मारहाण करीत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एका ऑस्ट्रेलियन नागरिकाला तालिबानच्या दहशतवाद्यांनी रक्तबंबाळ केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश नागरिकाला तालिबान्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे अफगाणिस्तानातील परदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

leave a reply