ट्रम्प यांचे बेकायदा निर्वासितांना रोखणारे ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण पुन्हा लागू करा

- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बायडेन प्रशासनाला दणका

‘रिमेन इन मेक्सिको’वॉशिंग्टन – अमेरिकेची सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे मोडीत काढणाऱ्या बायडेन प्रशासनाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. ट्रम्प यांनी देशात घुसणाऱ्या अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी तयार केलेले ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुन्हा लागू करावे, असा आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सत्ता हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी काही दिवसातच ‘रिमेन इन मेक्सिको’ रद्द करून अवैध निर्वासितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने सहा विरुद्ध तीन मतांनी बायडेन प्रशासनाविरोधात निर्णय दिला. ‘रिमेन इन मेक्सिको’ धोरण रद्द करताना बायडेन प्रशासनाने केंद्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. धोरण रद्द करण्याचा निर्णय मनमानी व लहरी असल्याचे दिसून येते, असा ठपका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. अवघ्या एका आठवड्यात ‘रिमेन इन मेक्सिको पॉलिसी’च्या मुद्यावरून न्यायालयाने बायडेन प्रशासनाला फटकारण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वोच्च न्यायालयापूर्वी टेक्सास प्रांतातील न्यायालयाने तसेच न्यू ऑर्लिन्समधील ‘फिफ्थ युएस सर्किट अपिल’ न्यायालयानेही बायडेन प्रशासनाचा निर्णय चुकीचा असल्याचे ताशेरे ओढले होते.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांच्या वाढत्या लोंढ्यांच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन प्रशासनाला ‘टायटल 42’ नावाच्या तरतुदीची अंमलबजावणी सुरू करावी लागली होती. अवैध निर्वासितांची थेट हकालपट्टी करणारी ही तरतूद माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लागू केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला बायडेन प्रशासनाने त्याला मुदतवाढ देत अंमलबजावणीही सुरू केली होती. त्यापाठोपाठ आता ‘रिमेन इन मेक्सिको’ही लागू करावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. ही गोष्ट ट्रम्प यांनी राबविलेली धोरणे योग्य होती, यावर शिक्कामोर्तब करणारी ठरत आहे, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. त्यात मेक्सिकोतून अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांची प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मेक्सिकोतच ठेवण्याच्या तरतुदीचा समावेश होता.

त्यामुळे बेकायदेशीररित्या अमेरिकेत येऊ पाहणारे हजारो निर्वासित मेक्सिकोतच अडकून पडले होते. या निर्वासितांविरोधात मेक्सिको सरकारलाही कारवाई करणे भाग पडले होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती. मात्र बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे निर्वासितांसंदर्भातील धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे होते असा ठपकाही बायडेन यांनी ठेवला होता.

दरम्यान, जुलै महिन्यात मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत घुसणाऱ्या अवैध निर्वासितांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकी यंत्रणांनी मेक्सिको सीमेवरून घुसणाऱ्या तब्बल 2 लाख, 12 हजार, 672 निर्वासितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. हा गेल्या 21 वर्षातील विक्रम ठरला आहे. एप्रिल 2000 नंतर एका महिन्यात दोन लाखांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या वाढत्या लोंढ्यांमुळे अमेरिकेच्या ‘टेक्सास’ प्रांतातील गव्हर्नरनी आधीच ‘इमर्जन्सी’ची घोषणा केली आहे.

leave a reply