नाटोप्रमाणेच युरोपिय महासंघाचे लष्करीकरण होत आहे

- रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा आरोप

न्यूयॉर्क – युरोपिय महासंघ व नाटोमध्ये आता फारसा फरक राहिला नसून महासंघाचेदेखील नाटोप्रमाणेच मोठ्या प्रमाणात लष्करीकरण होत आहे, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. लॅव्हरोव्ह संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी अमेरिकेत असून यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॅव्हरोव्ह यांनी यावरून इशारा दिला. नाटोने आपल्या विस्ताराची प्रक्रिया कधीही थांबविली नव्हती आणि तसा त्यांचा उद्देशही कधीच नव्हता, अशा शब्दात लॅव्हरोव्ह यांनी नाटोलाही लक्ष्य केले.

नाटोप्रमाणेच युरोपिय महासंघाचे लष्करीकरण होत आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा आरोपदोन दिवसांपूर्वी युरोपातील अभ्यासगट ‘सिप्री’ने जागतिक स्तरावरील संरक्षणखर्चाबाबत व्यापक अहवाल सादर केला होता. त्यात २०२२ साली युरोपिय देशांच्या संरक्षणखर्चात सर्वात मोठी वाढ झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. ‘शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच युरोपिय देशांच्या संरक्षणखर्चात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. १९८९ साली बर्लिनची भिंत पडल्यानंतर युरोपच्या संरक्षणखर्चात झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरते. यासाठी रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत ठरले आहे’, असे सिप्रीने आपल्या अहवालात म्हटले होते. सिप्रीच्या या अहवालाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी आपल्या वक्तव्यात, जानेवारी महिन्यात नाटो व युरोपिय महासंघामध्ये झालेल्या संयुक्त ठरावाचाही उल्लेख केला. या ठरावानुसार, ३१ सदस्यांचा समावेश असलेल्या नाटोच्या लष्करी आघाडीने राजकीय तसेच आर्थिक संघटना असलेल्या २७ सदस्य देशांच्या युरोपिय महासंघाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. जानेवारी महिन्यातील ठरावात नाटो व युरोपिय महासंघामधील सामरिक भागीदारीचा उल्लेख करण्यात आला आहे.

नाटोप्रमाणेच युरोपिय महासंघाचे लष्करीकरण होत आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा आरोपरशियाचे युक्रेनवरील आक्रमण हा गेल्या काही दशकांमध्ये ‘युरो-अटलांटिक’ क्षेत्राच्या सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा दावा संयुक्त ठरावात करण्यात आला आहे. सध्याची स्थिती ‘युरो-अटलांटिक’ क्षेत्राच्या सुरक्षा तसेच स्थैर्यासाठी निर्णायक असल्याचे सांगून त्यासाठी युरोपिय महासंघ व नाटोचे दृढ सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी हा ठराव म्हणजे युरोपिय महासंघ नाटोप्रमाणेच लष्करी सहकार्य व धोरणांवर अधिकाधिक भर देईल याचे संकेत असल्याचा दावा केला.

गेल्या काही वर्षात नाटोने स्वीडन व फिनलँडसारख्या सदस्य देश नसलेल्या देशांबरोबर सातत्याने लष्करी सरावांचे आयोजन केले होते. नाटोप्रमाणेच युरोपिय महासंघाचे लष्करीकरण होत आहे - रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांचा आरोपनाटोपासून अलिप्त असणारे देश व नाटो सदस्यांच्या लष्करी योजना यात समन्वय साधण्यासाठी हे सुरु होते, असा आरोप रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केला. यावेळी लॅव्हरोव्ह यांनी नाटोवर टीकास्त्रही सोडले. ‘नाटोने आपला विस्तार कधीच थांबविला नव्हता व तसा त्यांचा इरादाही नव्हता. आपण पुढे विस्तारणार नाही, असे नाटोकडून रशियाला वारंवार सांगण्यात येत होते. मात्र तो धडधडीत खोटेपणा होता’, अशी टीका परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही सातत्याने नाटोच्या विस्तारावर नाराजी दर्शविली आहे. युक्रेनवरील आक्रमणासाठी नाटोचा रशियन सीमांनजिक होणारा विस्तार हे प्रमुख कारण असल्याचेही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले होते. गेल्या दशकात युक्रेनने युरोपिय महासंघ व नाटो अशा दोन्ही संघटनांचा सदस्य होण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या हालचालींना रशियाने जोरदार विरोध केला होता.

leave a reply