युरोपात पाचशे वर्षातील सर्वात भयावह दुष्काळ

-‘युरोपिअन ड्रॉट ऑब्झर्व्हेटरी’चा अहवाल

Drought-Europe-river-Spainब्रुसेल्स – युरोप खंड गेल्या 500 वर्षातील भयावह दुष्काळ अनुभवत असून 60 टक्क्यांहून क्षेत्रात आणीबाणीची स्थिती असल्याचा इशारा ‘युरोपिअन ड्रॉट ऑब्झर्व्हेटरी’ने दिला. ब्रिटनसह, फ्रान्स, स्पेन व इटलीने देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. जर्मनी, हंगेरी, पोर्तुगाल या देशांमध्ये पिके तसेच झाडांचे अस्तित्व संकटात आले आहे. तर रोमानिया, स्लोव्हेनिया, पोलंड, क्रोएशिया यासारख्या देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई जाणविण्यास सुरुवात झाल्याचे युरोपियन यंत्रणेने बजावले आहे.

युरोपियन कमिशनचा भाग असलेल्या ‘युरोपिअन ड्रॉट ऑब्झर्व्हेटरी’ने नुकताच ऑगस्ट महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला. यात युरोप खंडातील भयावह दुष्काळाची माहिती दिली. युरोपातील सर्व प्रमुख जलस्रोतांचा स्तर नीचांकी पातळीपर्यंत घसरला आहे. 45 टक्क्यांहून अधिक भागातील भूजल पातळी आटली आहे. तर 17 टक्क्यांहून जास्त क्षेत्रातील शेती संकटात सापडल्याचे युरोपियन यंत्रणेने बजावले.

या वर्षाच्या सुरुवातीपासून युरोपातील अनेक देशांमध्ये दुष्काळाचे संकेत मिळाले होते. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली दिसून भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम युरोप व भूमध्य सागराजवळच्या युरोपिय देशांमध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे’, असा इशारा ‘युरोपिअन ड्रॉट ऑब्झर्व्हेटरी’ने दिला. युरोपियन कमिशनने याला दुजोरा देत, सध्याची स्थिती युरोप खंडात 500 वर्षातील सर्वाधिक भीषण दुष्काळ पडल्याचे दर्शविते, असे म्हटले आहे.

skynews-drought-europe-mapदुष्काळी स्थितीमुळे युरोपातील प्रमुख पिके असलेल्या मका, सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. युरोपियन महासंघाचा भाग असलेल्या ‘जॉईंट रिसर्च सेंटर’ने युरोपातील प्रमुख पिकांचे उत्पादन 12 ते 16 टक्क्यांनी घसरण्याचा इशारा दिला आहे. शेतीबरोबरच ऊर्जा, वाहतूक व पर्यटन क्षेत्रालाही दुष्काळाचा मोठा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले.

युरोपातील प्रमुख नद्यांची पातळी घसरल्याने त्यावर अवलंबून असणारे जलविद्युत प्रकल्प बंद पडले आहेत. नद्या तसेच जलाशय कोरडे पडल्याने त्यांच्यातून होणारी वाहतूक तसेच व्यापारही ठप्प झाला आहे. युरोपमधील आघाडीच्या शहरांमध्ये इंधन तसेच वीजेचे रेशनिंग सुरू झाल्याने पर्यटन व हॉटेलिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याने परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचवेळी विविध भागांमध्ये मोठे वणवे पेटल्याने त्या भागांमधील व्यवहारांवरही मर्यादा आल्या आहेत.

दुष्काळामुळे युरोपची अर्थव्यवस्थाही अडचणीत येत असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनसह फ्रान्स, जर्मनी या आघाडीच्या देशांनी वणवे व इतर घटकांमुळे अर्थव्यवस्थेचे अब्जावधी युरोचे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले आहे.

leave a reply