कोरोनाव्हायरस वुहान लॅबमध्येच तयार झाल्याचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध

- डॉ. ली मेंग यांचा दावा

वॉशिंग्टन – जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाव्हायरसची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली असून त्याचे शास्त्रीय पुरावे आपण लवकरच उघड करू, असा दावा चिनी संशोधिका डॉ. ली मेंग यान यांनी केला. ब्रिटनच्या ‘आयटीव्ही’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चिनी संशोधिकेने हा दावा करून, पुन्हा एकदा कोरोना साथीसाठी चीनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना साथीने आतापर्यंत जगभरात नऊ लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे.

Advertisement

कोरोनाव्हायरस वुहान लॅबमध्येच तयार झाल्याचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध - डॉ. ली मेंग यांचा दावायावर्षी जानेवारी महिन्यापासून चीनच्या वुहान शहरात कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर गेल्या आठ महिन्यात जगातील २००हुन अधिक देशांमध्ये या विषाणूची साथ पसरली असून अडीच कोटींहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. या साथीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून रुग्णांची संख्या ६५ लाखांवर गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच कोरोना च्या साथीसाठी चीनच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला असून चीनला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. जगातील अनेक संशोधक व वैद्यकतज्ज्ञांनी कोरोना साथ फैलावणाऱ्या विषाणूची निर्मिती चीनमध्येच झाल्याचे आरोप केले असून डॉ. ली मेंग यान त्यातील आघाडीच्या संशोधक मानल्या जातात.

चीनमध्ये जन्मलेल्या व गेल्या काही वर्षांपासून हॉंगकॉंगच्या ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ या विद्यापीठात संशोधिका म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर ली यांनी काही महिन्यांपूर्वी, ‘फॉक्स न्यूज’ या अमेरिकी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात बोलताना त्यांनी चीन कोरोनाचे सत्य लपवीत असल्याचा ठपका ठेवला होता. ‘चीनच्या राजवटीबरोबरच या देशातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच संशोधकांनाही या साथीच्या फैलावाची मुख्य कारणे माहीत होती. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या साथीचा इशारा देणारा अहवाल आपण वरिष्ठांकडे सोपविला होता. पण वरिष्ठांनी माझे संशोधन दुर्लक्षित केले आणि याबाबत शांत राहण्याचा सल्ला दिला.

कोरोनाव्हायरसचा फैलाव मानवी संक्रमणातून होतो, याची पूर्ण माहिती चीनला होती. ही माहिती उघड करुन अनेकांचा जीव वाचविता आला असता. पण चीनने ही माहिती जगापासून दडवून ठेवली’, असा दावा करून डॉ. यान यांनी जगभरात खळबळ उडवली होती.

कोरोनाव्हायरस वुहान लॅबमध्येच तयार झाल्याचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध - डॉ. ली मेंग यांचा दावात्यानंतर आता ब्रिटीश चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कोरोना चिनी लॅबमध्येच तयार झाल्याचे पुरावे आपण जगासमोर लवकरच उघड करू असा इशारा डॉ. ली यांनी दिला आहे. ‘कोरोना विषाणूचा जिनोम सिक्वेन्स मानवी बोटाच्या ठशाप्रमाणे आहे. तो नैसर्गिक नाही. हा विषाणू चीनमधील लॅबमध्येच कसा तयार झाला व तेच याची निर्मिती कशी करू शकतात ही सर्व माहिती मी माझ्याकडील पुराव्यांच्या जोरावर उघड करेन’, असा दावाही डॉ. ली मेंग यांनी मुलाखतीत केला. विषाणूचे मूळ जाणून घेणे जरुरीचे असून, तसे नाही घडले तर तो जगातील प्रत्येकासाठी धोकादायक ठरू शकतो, असेही चिनी संशोधिकेने बजावले.

डॉ. ली मेंग यान यांच्याबरोबरच चीनच्या वुहान प्रयोगशाळेच्या प्रमुख संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनीही कोरोनाच्या विषाणूचा जन्म वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याचे मान्य केले होते. मात्र कालांतराने चीन सरकारच्या दबावानंतर त्यांनी आपल्या विधानापासून माघार घेतली होती. नोबेल पुरस्कार विजेते फ्रेंच संशोधक ‘लुक मौंटेनीर’ यांनीदेखील कोरोनाव्हायरसची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली, असा स्पष्ट आरोप केला होता. साधारण २० वर्षांपासून वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोनाव्हायरसवर संशोधन सुरू होते आणि या संशोधनात चीनने चांगलीच पकड मिळविली होती, असा दावा मौंटेनीर यांनी फ्रेंच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

leave a reply