नातांझ अणुप्रकल्पाजवळील स्फोटाने इराण हादरला

- हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेतल्याचा इराणचा दावा

नातांझतेहरान – इराणला अण्वस्त्रांच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी आपण काहीही करू, असा इशारा इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या प्रमुखांनी दिला होता. याला काही तास उलटत नाही तोच, शनिवारी इराणच्या अतिमहत्त्वाच्या नातांझ अणुप्रकल्पाजवळ मोठा स्फोट झाला. यामुळे इस्रायलने आपला इशारा प्रत्यक्षात तर उतरविला नाही ना, अशी चर्चा सुरू होऊन घबराहट माजली होती. पण इराणच्या लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेतल्याचे जाहीर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. याआधी नातांझ अणुप्रकल्पातील संशयास्पद स्फोटांप्रकरणी इराणने गोंधळ वाढविणारी माहिती प्रसिद्ध केली होती. त्यामुळे शनिवारच्या या स्फोटाकडे संशयाने पाहिले जात आहे.

नातांझइराणच्या इस्फाहन प्रांतातील नातांझ शहरात युरेनियम संवर्धनाचा मोठा प्रकल्प आहे. इराणच्या अणुकार्यक्रमासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प मानला जातो. शनिवारी रात्री ८.१५ वाजता नातांझ अणुप्रकल्पापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बदरुद भागात मोठा स्फोट झाला. स्थानिकांनी इराणी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या आवाजानंतर बदरुदच्या हवाईहद्दीत ठिकर्‍या उडून प्रकाशाचा मोठा झोत तयार झाला होता. या बातमीमुळे काही काळासाठी नातांझसह इराणमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इराणच्या लष्कराचे प्रवक्ते जनरल आमिर तारीखानी यांनी नातांझच्या हद्दीत हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. इराण कुठल्याही हवाई हल्ल्यांसाठी तयार असल्याची चाचणी घेतल्याचे तारीखानी यांनी सांगितले. या चाचणीत इराणने ड्रोन यशस्वीरित्या भेदल्याचा दावा केला जातो. तसेच इराणच्या लष्कराने या चाचणीबाबत गोपनीयता राखली होती. त्यामुळे स्फोटानंतर ही माहिती उघड केली. पण इराणचे लष्कर देत असलेल्या खुलासाकडे संशयाने पाहिले जाते.

नातांझगेल्या दीड वर्षात इराणच्या नातांझ अणुप्रकल्पामध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे इराणच्या अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेसचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. इराणचा अणुकार्यक्रम काही महिन्यांसाठी पिछाडीवर पडल्याचे बोलले जाते. इराणच्या काही नेत्यांनी या स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. तर काहींनी अणुप्रकल्पाचे विशेष नुकसान नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे शनिवारी नातांझच्या हवाईहद्दीजवळ झालेल्या या स्फोटाकडे संशयाने पाहिले जाते.

या स्फोटाच्या काही तास आधीच इस्रायलची ख्यातनाम गुप्तचर संस्था ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीचा धोका कमी करण्यासाठी मोसाद काहीही करायला तयार असल्याचे जाहीर केले होते. तर इराणबरोबर कुठल्याही प्रकारचा वाईट अणुकरार खपवून घेणार नसल्याचे बार्नी यांनी बजावले होते. तर गेल्या महिन्यात इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्यासाठी आपल्या हवाईदलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, व्हिएन्ना येथे अणुकरारावर चर्चा सुरू असताना इस्रायलने इराणविरोधात गोपनीय मोहीम राबवू नये, अशी सूचना अमेरिकेने इस्रायलला केली होती, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा परिस्थितीत, शनिवारी नातांझजवळ झालेल्या स्फोटाकडे अधिक संशयाने पाहिले जाते.

leave a reply