चीनच्या तैवान क्षेत्रातील हालचाली म्हणजे रंगीत तालीम

- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

रंगीत तालीमवॉशिंग्टन/तैपेई – चीनच्या लढाऊ विमानांकडून तैवानच्या हद्दीत सुरू असणार्‍या हालचाली ही भविष्यातील मोहिमेसाठी रंगीत तालीम असू शकते, असा दावा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केला. तर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी व संसद सदस्यांनी तैवान मुद्यावरून अमेरिका-चीन संघर्ष भडकल्यास, चीन अमेरिकेवर मोठे सायबरहल्ले चढवेल अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी तैवान मुद्यावरून चीनला इशारा दिला असून हल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे बजावले आहे.

गेल्या वर्षभरात चीनच्या विमानांची तैवानच्या हवाईहद्दीतील घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच चीनच्या दीडशेहून अधिक विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. तसेच गेल्या आठवड्यात ४०हून अधिक चिनी विमाने तैवानच्या हद्दीत घुसल्याचे समोर आले होते. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून सुरू असणारी ही घुसखोरी ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग आहे. मात्र गेल्या काही महिन्यात चीनचे नेतृत्त्व तसेच प्रसारमाध्यमे तैवानला आक्रमक शब्दात युद्धाबाबत धमकावित आहेत. ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने एका लेखात चीनच्या हवाईदलाला तैवानच्या हद्दीचा चांगला सराव झाला असून हल्ल्यादरम्यान याचा फायदा होईल, असा दावा केला होता.

रंगीत तालीमचीनच्या या आक्रमकतेचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. ‘या मुद्यावर आपण उगाच तर्क-वितर्क लढविणार नाही. पण चीनकडे असलेल्या क्षमतांचा विचार करता ते तैवानच्या क्षेत्रात रंगीत तालीम करीत आहेत, असे म्हणता येईल’, असे उत्तर ऑस्टिन यांनी दिले. यावेळी त्यांनी अमेरिका ही पॅसिफिक क्षेत्रातील सत्ता असल्याचे सांगून, एकाधिकारशाही असलेल्या चीनचा उदय हे या क्षेत्रात अमेरिकेसमोरचे मोठे आव्हान असल्याचा दावाही केला.

‘रिगन नॅशनल डिफेन्स फोरम’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अमेरिकेच्या इतर वरिष्ठ अधिकारी व संसद सदस्यांनी चीनच्या सायबरहल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. तैवानच्या मुद्यावरून अमेरिका-चीन संघर्ष भडकल्यास चीन अमेरिकी यंत्रणांना खिळखिळे करणारे सायबरहल्ले चढवू शकतो, असा इशारा आर्मी सेक्रेटरी ख्रिस्तिन वॉरमुथ यांनी दिला. अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर जॅक रीड यांनीही याला दुजोरा देऊन, राखीव दल व पुरवठ्याला लक्ष्य करणारे सायबरहल्ले होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी तैवानच्या मुद्यावरून चीनला इशारा दिला आहे. ‘तैवानवर आक्रमण करण्यापूर्वी चीनचे नेते योग्य विचार करतील, अशी अपेक्षा आहे. चीनने असा प्रयत्न केलाच तर अनेकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील व ते कोणाच्याच हिताचे असणार नाही’, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी बजावले.

leave a reply