‘आयएस’ दहशतवादी अबु युसूफच्या घरातुन स्फोटके व हल्ल्याचे साहित्य जप्त

नवी दिल्ली – दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या ‘आयएस‘चा दहशतवादी ‘मोहम्मद मुस्ताकिम खान’ उर्फ ‘अबु युसूफ’च्या उत्तरप्रदेशमधील घरातुन आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री दिल्ली स्पेशल सेल पोलिसांनी ‘आयएस‘चा दहशतवादी ‘अबु युसूफ’ला दिल्लीतून अटक केली होती.अबू युसूफ मूळचा उत्तरप्रदेश बलरामपूरचा रहिवासी आहे. दिल्लीतील अटकेदरम्यान त्याच्याकडून १५ किलोचे दोन आयईडी जप्त करण्यात आले होते.

स्फोटके

शनिवारी केलेल्या कारवाईत त्याच्या घरातुन आत्मघातकी हल्ल्याचे साहित्य, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी स्फोटके, आयएसचा झेंडा जप्त करण्यात आला. या छाप्यात स्फोटके फिट करण्यासाठी वापरले जाणारे जॅकेटही जप्त करण्यात आले. यातील तपकिरी रंगाच्या जॅकेटमध्ये स्फोटकांची तीन पाकिटे होती. याचबरोबर एका निळया रंगाच्या जॅकेटमध्ये चार स्फोटकांची पाकिटे होती. यासह स्फोटकांनी भरलेला चामडयाचा पट्टा सापडला असून त्याचे वजन अंदाजे तीन किलो आहे. जप्त करण्यात आलेल्या जॅकेटच्या वापर आत्मघातकी हल्ल्यासाठी करण्यात येतो.

‘अबु युसूफ’च्या घरातून एकूण ९ किलो स्फोटक साहित्य, सात बॉक्स, टायमर, चार बॅटरीज, देखील जप्त करण्यात आल्या. ‘अबु युसूफ’ ला ‘आयएस’ने ‘लोन वुल्फ’ म्हणजे एकट्याने करायच्या हल्ल्यासाठी तयार केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले होते. अबू युसूफ हा आयएस कमांडर्सच्या थेट संपर्कात होता. सुरुवातीला, त्याला सीरियामध्ये मारला गेलेला युसूफ अल हिंदीकडून सूचना मिळत होत्या.

स्फोटके

त्यानंतर अबू हुझाफा या पाकिस्तानी दहशतवाद्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र अफगाणिस्तानात ड्रोन हल्ल्यात हुझाफा ठार झाला. त्यानंतर ‘आयएस’ने त्याला ‘लोन वुल्फ अटॅक’साठी तयार केले. स्वातंत्र्यदिनी राजधानीत मोठा हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्याने आखला होता. पण दिल्लीतल्या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे त्याचा हा कट अयशस्वी ठरला.

leave a reply