भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब असणारी स्वदेशी खेळणी तयार करा

- पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली – खेळणी मुलांच्या मनाला चांगला आकार देतात. म्हणूनच देशातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये येणार्‍या विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या खेळण्यांचा वापर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत भारतातच खेळणी तयार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी कारखान्यांना केले आहे. युवकांनी पुढे येऊन आपल्या कौशल्याचा वापर करुन खेळणी तयार करा आणि ‘वोकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन द्या, असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

खेळणी

या क्षेत्रातील संबंधितांशी पंतप्रधानांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना, पंतप्रधानांनी स्वदेशी बनावटीच्या पण भारताच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असणारी खेळणी तयार करण्याचे आवाहन केले. ‘खेळणी हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. अंगणवाडी आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘खेळणी’चे खूप महत्त्व आहे’, असे पंतप्रधान आवर्जुन म्हणाले. तसेच खेळणी हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे प्रतिनिधित्व करते, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

देशातील अनेक कारागीर उत्कृष्ट खेळणी तयार करतात. त्यांना संधी दिल्यास देशात मोठ्या प्रमाणावर खेळण्यांचे उत्पादन होईल, याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी करुन दिली. शिवाय देशातल्या युवकांनी तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करुन खेळणी विकसित करायला हवीत. त्यांचा दर्जा उत्तम ठेवायला हवा. यामुळे देशातल्या खेळण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. यामुळे भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’उपक्रमाला चालना मिळेल, असे पंतप्रधानांनी म्हटले. देशातल्या ज्या भागात हस्तकलेचा वापर करुन खेळणी तयार केली जातात. त्या भागाचा पर्यटनासाठी वापर करता येईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

खेळणी

चीनबरोबरच्या वाढत्या तणावानंतर, भारताने ‘मेड इन चायना’वर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. भारताने हळुहळू प्रत्येक क्षेत्रातून चीनची गुंतवणूक कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून भारत खेळण्यांची बाजारपेठही यातून वगळलेली नाही. भारत चीनकडून तब्बल ७० टक्के खेळणी आयात करतो. २०१९-२०च्या आर्थिक वर्षात भारताने चीनकडून ४,००० कोटी रुपयांची खेळणी आयात केली होती. पण आता भारताने चीनवरचे अवलंबित्व कमी करायला सुरुवात केली. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत आता भारतातच उत्पादने तयार केली जाणार आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून मोठ्या प्रमाणावर ‘मेड इन चायना’ गणेशमूर्ती आयात केल्या जातात. दरवर्षी चीन भारताला ५०० कोटी रुपयांची गणेशमूर्ती निर्यात करतो. पण यावर्षी भारतीयांनी चिनी मालाकडे पाठ फिरवून ‘मेड इन इंडिया’ गणेशमूर्तीला प्राधान्य दिले. ‘कंफरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने(सीएआयटी) ही माहिती दिली.

leave a reply