कोरोना संकटानंतरही पहिल्या तिमाहीत देशाच्या निर्यातीमध्ये 95 अब्ज डॉलर्सपर्यंत विक्रमी वाढ

  • गेल्यावर्षीच्या तुलनेत 85.36 टक्क्यांनी निर्यात वाढली
  • निर्यात वाढीच्या बाबतीत बड्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटानंतर भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून पहिल्या तिमाहीतील निर्यातीमध्ये झालेल्या विक्रमी वाढीने ही बाब अधोरेखित होत असल्याचे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. एप्रिल ते जून या सुरू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मर्चेंडाईज एक्सपोर्ट अर्थात माल निर्यात 95 अब्ज डॉलर्सवर गेली. एप्रिल महिन्यातील निर्यातच गेल्यावर्षीच्या तुलनेत 200 टक्के अधिक आहे. तसेच संपूर्ण तिमाहीची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 85.36 टक्के जास्त आहे. निर्यात वाढीच्या बाबतीत भारताने अमेरिका, ब्रिटन, जपान, युरोपिय महासंघ, दक्षिण कोरियासारख्या बड्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे.

वाणिज्यमंत्री गोयल आणि शहर विकासमंत्री हरदिप सिंग पुरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सुरू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रमी माल निर्यातीकडे लक्ष वेधले. पहिल्या तिमाहीत तब्बल 95.36 अब्ज डॉलर्सची माल निर्यात झाली. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीत 90 अब्जाची माल निर्यात झाली होती. त्या तुलनेत पुढील तिमाही निर्यातीमध्ये आणखी 5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 51.44 अब्ज डॉलर्सची माल निर्यात झाली होती. तर एप्रिल-जून 2019 सालात 80.91 अब्ज डॉलर्स इतकी माल निर्यात नोंदविण्यात आली होती. एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2021 च्या एप्रिलमध्ये भारताने आतापर्यंत सर्वाधिक निर्यात वाढ नोंदविली आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल 200 टक्क्यांहून अधिक आहे. निर्यात वाढीचा इतका दर भारताने कधीही नोंदविलेला नाही, याकडेे वाणिज्यमंत्री गोयल यांनी लक्ष वेधले.

गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीचा पहिल्यांदाच उद्रेक झाला होता व देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे निर्यात घसरली होती. त्यामुळे ही मोठी तफावत दिसून येत आहे. मात्र याआधीच्या आर्थिक वर्षाच्या अर्थात 2019-20 सालातील पहिल्या तिमाहीत निर्यातीपेक्षाही यावर्षातील निर्यात 18 टक्के अधिक आहे. जागतिक व्यापारी संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार युरोपिय महासंघाची एप्रिल महिन्यातील निर्यात वाढ ही 68 टक्के, जपानची 36 टक्के, दक्षिण कोरियाची 41 टक्के, ब्रिटनची 32 टक्के आणि अमेरिकेची 53 टक्के होती. या तुलनेत भारताचा निर्यात वाढ कितीतरी अधिक असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

जून महिन्यातही माल निर्यातीत विक्रमी नोंद झाली आहे. 32.36 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. ही गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत 47.34 टक्क्यांनी जास्त आहे. 2020च्या जून महिन्यात 22.03 अब्ज डॉलर्स इतका मर्चेंडाईज एक्सपोर्ट नोंदविण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात भारतातील थेट परकीय गुंतवणुकीतही (एफडीआय) मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात 6.24 अब्ज डॉलर्सचा एफडीआय भारतात आला. हा गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत 38 टक्के जास्त आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात अर्थात 2020-21 सालात तब्बल 81.72 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक भारतात झाल्याची माहितीही वाणिज्यमंत्री गोयल यांनी दिली.

भारताची निर्यात वाढत आहे, त्याचवेळी परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे भारत सरकार योग्य मार्गाने पुढे जात असल्याचे दर्शवते, असे गोयल म्हणाले. सरकारने विविध सुधारणा कार्यक्रम राबविले आहेत. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचलेल्या पावलांचा हा परिणाम असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

leave a reply