रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची बाल्टिक देशांमधूनही हकालपट्टी

प्राग/विल्निअस/मॉस्को – रशिया आणि पाश्‍चिमात्य देशांमधील राजनैतिक संघर्ष तीव्र झाला आहे. रशियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करणार्‍या झेक प्रजासत्ताक, पोलंड या नाटो सदस्य देशांच्या रांगेत आता लिथुआनिया, लाटव्हिया आणि इस्टोनिया या रशियाच्या शेजारी असलेल्या बाल्टिक देशांचीही भर पडली. तर अमेरिकेनेही वॉशिंग्टनमधील रशियाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले आहेत. अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या या देशांच्या कारवाईवर रशियाने टीका केली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला झेक प्रजासत्ताक या नाटोच्या सदस्य देशाने रशियाच्या १९ राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती. या कारवाईसाठी सहा वर्षांपूर्वीची घटना जबाबदार असल्याचे झेकच्या सरकारने म्हटले होते. २०१४ साली झेक प्रजासत्ताकाच्या लष्करी कोठारात भीषण स्फोट झाले होते. त्यावेळी ही एक दुर्घटना असल्याची घोषणा झेकच्या लष्कराने केली होती. पण याप्रकरणी रशिया असून रशियन गुप्तचर यंत्रणेच्या एजंट्सनी हे स्फोट घडविल्याचा आरोप करून झेक यंत्रणेने रशियन राजनैतिक अधिकार्‍यांवरील आपल्या कारवाईचे समर्थन केले.

प्रत्युत्तरादाखल रशियानेही झेकच्या २० राजनैतिक अधिकार्‍यांना इशारा देऊन हकालपट्टी केली. यामुळे खवळलेल्या झेक सरकारने काही तासांपूर्वी रशियाच्या तब्बल ६३ राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याची बातमी समोर येत आहे. झेक प्रजासत्ताकने रशियावर केलेली ही मोठी कारवाई असल्याचा दावा केला जातो. रशिया आणि झेकमध्ये हा राजकीय वाद पेटत असताना, लिथुआनिया, लॅटव्हिया आणि इस्टोनिया या बाल्टिक देशांनीही शुक्रवारी रशियाच्या चार राजनैतिक अधिकार्‍यांची मायदेशी रवानगी केली.

युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये रशियाच्या हेरांना स्थान नाही, अशी टीका लिथुआनियाचे परराष्ट्रमंत्री गॅब्रिलियस लँडबर्गिस यांनी केली. तर लाटव्हिया आणि इस्टोनिया या देशांनीही झेकने रशियावर केलेल्या कारवाईला समर्थन म्हणून रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे. लिथुआनिया, लाटव्हिया आणि इस्टोनिया हे बाल्टिक देश एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होते. १९९०च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या विभाजनानंतर बाहेर पडलेल्या या बाल्टिक देशांनी युरोपिय देशांबरोबर जुळवून घेतले आहे.

काही तासांपूर्वी रशियाने पोलंडच्या पाच राजनैतिक अधिकार्‍यांना मायदेशी रवाना करून पोलंडला गेल्या आठवड्यातील कारवाईसाठी जशास तसे उत्तर दिले. पण बाल्टिक देशांनी आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यामुळे रशियाला धक्का बसला आहे. इस्टोनियाने आधाराशिवाय आपल्या अधिकार्‍याची हकालपट्टी केल्याची टीका रशियाने केली आहे. तसेच या कारवाईसाठी बाल्टिक देशांना प्रत्युत्तर देणार नसल्याचे संकेत रशियाने दिले आहेत.

दरम्यान, अमेरिका व अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेले पाश्‍चिमात्य देश काल्पनिक जगात वावरत असल्याचे ताशेरे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी ओढले आहेत. तसेच पाश्‍चिमात्य देश सामुहिकपणे रशियाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप झाखारोव्हा यांनी केला.

leave a reply