अफगाणी सुरक्षा यंत्रणेकडून ७८ तालिबानी ठार

काबुल – अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तान तालिबानच्या हाती पडेल, अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे. मात्र अफगाणी लष्कराने तालिबानवर जबरदस्त हल्ले चढवून आपली क्षमता सिद्ध केल्याचे दिसू लागले आहे. अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी गेल्या २४ तासात ७८ तालिबानींना ठार केले आहे. यानंतर अफगाणिस्तानातील संघर्ष भयंकर स्वरुप धारण करणार असल्याचे दिसत आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘अफगाण नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी फोर्सेस’ने तालिबानच्या विरोधात गेल्या चोवीस तासात आठ प्रांतांमध्ये कारवाई केली आहे. यामध्ये हेल्मंड, कंदहार, गझनी, झाबूल, हेरात, पाकतिका, बलख आणि निमरोझ या प्रांतांचा समावेश आहे. या कारवाईत ७८ तालिबानींना ठार तर आठ जणांना अटक केली आहे. याशिवाय तालिबानचे ४४ दहशतवादी जखमी झाल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

सदर कारवाईत अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी तालिबानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. तसेच ३६ आईडी स्फोटके आणि भुसूरूंग निकामी केले. या संपूर्ण कारवाईत अफगाणी सुरक्षा यंत्रणेची किती जीवितहानी झाली, याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली नाही. दोन दिवसांपूर्वी अफगाणी लष्कराने गझनीमधील कारवाईत २० हून अधिक तालिबानींचा खातमा केला होता. तर दोन आठवड्यांपूर्वी एका दिवसात ६८ तर ४८ तासात १२० हून अधिक तालिबानींना ठार केले होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केल्यापासून अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी तालिबानच्या विरोधातील कारवाईची तीव्रता वाढविली आहे. या कारवाईमध्ये अफगाणी लष्कराकडून हवाई हल्ल्यांचा देखील वापर होत आहे. अफगाणी संरक्षण मंत्रालय व लष्कराकडून प्रसिद्ध होणार्‍या माहितीनुसार, पाकिस्तान तसेच इराणच्या सीमेजवळ अफगाणी लष्कराच्या कारवाया सुरू असल्याचे या माहितीतून स्पष्ट होत आहे. यामध्ये पाकिस्तानच्या सीमेवरील पाकतिका, पाकतिया या प्रांतांचा समावेश आहे.

अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईवर तालिबानने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तालिबानमधील एका गटाने अफगाणींना धमकावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वीस वर्षांच्या या संघर्षात अमेरिका व नाटोच्या लष्कराला सहाय्य करणार्‍या, माहिती पुरविणार्‍या अफगाणींना ठार करण्याची धमकी तालिबानने दिली आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही माहिती प्रसिद्ध केली.

अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने जाहीर केलेल्या सैन्यमाघारीवर आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे. या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात पुन्हा गृहयुद्ध भडकेल. तसेच अफगाणिस्तानातील महिला व मुलींवर तालिबान अत्याचार सुरू करील, असा इशारा अमेरिकी नेते, सिनेटर्स व विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply