रशियन सीमेनजिक नाटोचा व्यापक युद्धसराव

- युक्रेनसह स्वीडन व फिनलँडचा सहभाग

तालिन/ब्रुसेल्स – रशिया-युक्रेन युद्ध अधिकाधिक तीव्र होत असतानाच नाटोने रशियन सीमेला जोडून असलेल्या इस्टोनियामध्ये व्यापक युद्धसराव सुरू केला आहे. या सरावात 11 देशांचे 15 हजारांहून अधिक जवान सहभागी झाले आहेत. रशियाविरोधात युद्ध सुरू असलेल्या युक्रेनसह नाटोतील सहभागासाठी तयारी दर्शविणाऱ्या फिनलँड व स्वीडनच्या लष्करी तुकड्याही या सरावात सामील झाल्या आहेत. त्यामुळे हा सराव रशियावरील दडपण वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जाते. सराव सुरू होत असतानाच नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी युक्रेन रशियाविरोधातील युद्ध जिंकू शकतो, असा दावा केला आहे.

रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेला जवळपास 80हून अधिक दिवस उलटले आहेत. या कालावधीत रशियाने पूर्व व दक्षिण युक्रेनमधील मोठा भाग ताब्यात घेतला आहे. मात्र पाश्चिमात्य माध्यमे व यंत्रणांच्या दाव्यानुसार, रशियाला युक्रेन युद्धात अपेक्षित यश मिळालेले नाही. युक्रेनच्या लष्कराने केलेल्या प्रखर संघर्षामुळे रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे व जास्तीत जास्त भाग ताब्यात घेण्याचे इरादे धुळीस मिळविल्याचे म्हटले जाते. अमेरिका व नाटो देशांनी युक्रेनला केलेल्या संरक्षणसहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर नाटोने युक्रेनला करण्यात येणारे संरक्षणसहकार्य अधिकाधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रसाठ्यासंदर्भात अनेक नियम शिथिल करण्यात आले असून शस्त्रपुरवठ्याची गतीदेखील वाढविण्यात आली आहे. त्याचवेळी नाटो युक्रेनच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी रशियानजिकच्या देशांमध्ये व्यापक युद्धसराव आयोजित करून रशियावर दबाव आणण्याच्या हालचालीही सुरू आहेत.

गेल्या आठवड्यात युरोपमधील नॉर्थ मॅसिडोनियामध्ये ‘स्विफ्ट रिस्पॉन्स 22′ सरावाचे आयोजन करण्यात आले होते. हा सराव संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसात रशियन सीमेला जोडून असलेल्या इस्टोनियामध्ये ‘हेजहॉग’ नावाचा युद्धसराव सुरू झाला आहे. हा सराव 3 जूनपर्यंत सुरू राहणार असून त्यात 11 देश सहभागी झाले आहेत. इस्टोनियात होणारा हा सर्वात मोठा सराव असून यात लढाऊ विमाने, युद्धनौका, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, क्षेपणास्त्रे तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम्सचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

leave a reply