कट्टरवाद्यांमुळे फ्रान्सच्या ठिकर्‍या उडतील

- माजी लष्करी अधिकार्‍यांचा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना इशारा

पॅरिस – फ्रान्ससमोर गंभीर संकट खडे ठाकले आहे. कट्टरवाद्यांकडून मिळत असलेल्या आव्हानांमुळे फ्रान्सच्या ठिकर्‍या उडतील. सेवानिवृत्त असलो तरी फ्रान्सला गृहयुद्धाचा धोका असताना आम्ही स्वस्थ बसू शकत नाही’, अशा खणखणीत शब्दात फ्रान्सच्या जनरलपदावरून निवृत्त झालेल्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना इशारा दिला. देश वाचविण्यासाठी फ्रान्सचे सरकार आवश्यक ती पावले उचलत नसल्याची टीका करणारे पत्र या माजी लष्करी अधिकार्‍यांनी प्रसिद्ध केले आहे. जर फ्रान्सच्या सुरक्षेसाठी सरकार योग्य निर्णय घेणार असेल, तर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सरकारला आपला पाठिंबा असेल, असेही या माजी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. फ्रान्सच्या उजव्या गटाच्या नेत्या मरिन ली पेन यांनी या पत्राचे स्वागत केले, तर संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पर्ली यांनी यावर सडकून टीका केली आहे.

फ्रान्समध्ये कट्टरवाद्यांचा वाढता प्रभाव ही फार मोठ्या चिंतेची बाब बनल्याचे या देशातील उजव्या गटाचे नेते आणि तटस्थ निरिक्षक देखील परखडपणे सांगू लागले आहेत. याकडे बराच काळ दुर्लक्ष करून यासंदर्भात ठाम निर्णय घेण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर उजव्या गटाकडून जोरदार टीका होत आहे. तर दुसर्‍या बाजूला फ्रान्समधील उदारमतवादी गट याच्या नेमकी विरुद्ध भूमिका स्वीकारीत आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यापासून फ्रान्सच्या उदारमतवादी धोरणांना धोका असल्याचे उदारमतवाद्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत फ्रान्सच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना देशाच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र लिहून प्रसिद्ध केले आहे.

जनरल पदावरून निवृत्त झालेल्या सुमारे २० अधिकार्‍यांची या पत्रावर स्वाक्षर्‍या आहेत. याबरोबरच सदर पत्रावर फ्रान्सच्या लष्करातील कनिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या सुमारे हजार अधिकार्‍यांनीही या पत्रावर स्वाक्षर्‍या केलेल्या आहेत. त्यामुळे या पत्राची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये कट्टरवाद फोफावत असून देशाच्या उपनगरांमध्ये संविधानाला आव्हान मिळत आहे. फ्रान्समध्ये कट्टरवादाचे जहर मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. अशा काळात काहीही न करता आपण स्वस्थ बसून राहिलो तर परिस्थिती चिघळेल आणि मोठा विस्फोट होईल आणि त्यात फ्रान्सच्या ठिकर्‍या उडतील. देशासमोर हे संकट असताना आम्ही निवृत्त सैनिक स्वस्थ राहू शकत नाही. फ्रान्सच्या रक्षणाचे काम जमत नसेल, तर सैन्याकडे कारभार सोपवा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

मात्र जर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास तयार असतील, तर आम्ही त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असे या पत्रात माजी लष्करी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. फ्रान्सच्या उजव्या गटाच्या नेत्या मरिन ली पेन यांनी माजी लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेली चिंता आपण समजू शकतो, असे सांगून या पत्राचे स्वागत केले. आपण देशासाठी छेडत असलेल्या या लढ्यात माजी लष्करी अधिकार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मरिन ली पेन यांनी केले आहे.

मरिन ली पेन फ्रान्सला कट्टरवादापासून फार मोठा धोका संभवतो, हे वारंवार बजावत आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, माजी लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेली चिंता त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत असलेली बाब ठरते. मात्र पेन यांच्या भूमिकेवर फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पर्ली यांनी सडकून टीका केली आहे. हे माजी अधिकारी आता फ्रेंच सैन्याचा भाग नाहीत. त्यामुळे या पत्रात व्यक्त केलेले विचार हे या अधिकार्‍यांचे वैयक्तिक पातळीपुरते मर्यादित आहेत. मात्र तटस्थता आणि निष्ठा या दोन आधारांवर कुठल्याही देशाचे सैन्य कार्यरत असते. मरिन ली पेन यांनी केलेले आवाहन बेजबाबदार असून त्यांनी आपल्याला सैन्याशी निगडीत या गोष्टी कळत नसल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका संरक्षणमंत्री पर्ली यांनी केली आहे.

leave a reply