इस्रायलवरील रॉकेट हल्ले रोखा अन्यथा जोरदार प्रत्युत्तर मिळेल

- इस्रायलचा हमासला इशारा

जेरूसलेम/गाझा – गेले तीन दिवस सलग इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले चढविणार्‍या गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांना इस्रायलने इशारा दिला. ‘इस्रायलवरील रॉकेट हल्ले आजच्या आज रोखले नाही तर तुमच्या ठिकाणांवर भीषण हल्ले चढवू’, असे इस्रायलने बजावले आहे. त्याआधी इस्रायलने गाझापट्टीची सागरी सीमा बंद केली. इस्रायलच्या या कारवाईनंतर हमासने गंभीर परिणामांची धमकी दिली आहे.

शुक्रवार रात्रीपासून गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये इस्रायलवर ४० हून अधिक रॉकेट हल्ले झाल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. इस्रायली लष्कराच्या आयर्न डोम यंत्रणेला यातील बहुतांश रॉकेट्स भेदण्यात यश मिळाले. तर काही रॉकेट्स निर्जन भागात कोसळले. सुरुवातीला इस्रायली लष्कराने गाझातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले चढवून या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले होते. पण रविवारपासून इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केले जाणारे हे हल्ले थांबविले आहेत.

सोमवारी सकाळी इस्रायलने गाझापट्टीची सागरी सीमा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केली आहे. याआधी इस्रायलने पॅलेस्टिनी मच्छिमारांना किनारपट्टीपासून फक्त नऊ मैल अंतरापर्यंत मासेमारी करण्याची परवानगी दिली होती. पण हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी चढविलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने गाझातील मच्छिमारांना दिलेली परवानगीही काढून घेतली आहे.

गाझापट्टीतील पॅलेस्टिनींसाठी मासेमारी हा महत्त्वाचा आर्थिक स्त्रोत मानला जातो. इस्रायलने गाझापट्टीची सीमारेषा बंद केली तरी मासेमारीवर बंदी टाकली जात नाही. १९९०च्या दशकात इस्रायल आणि पॅलेस्टिनी नेत्यांमध्ये ओस्लो येथे झालेल्या शांतीकरारानुसार, गाझाच्या किनारपट्टीपासून २० मैल अंतरापर्यंतच्या हद्दीत मासेमारीची परवानगी इस्रायलने दिली होती. पण २००७ साली हमासने गाझापट्टीचा ताबा घेतल्यानंतर इस्रायलने ही मर्यादा सहा मैल अंतरापर्यंत आणली होती.

पुढे इजिप्तने मध्यस्थी केल्यानंतर मासेमारीसाठी आवश्यक क्षेत्राच्या मर्यादेत वाढ करण्यात आली होती. पण गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने पूर्ण बंदी जाहीर केले आहे. या कारवाईमुळे खवळलेल्या हमासने इस्रायलला गाझाच्या किनारपट्टीवर लादलेली बंदी मागे घेण्याची अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी दिली आहे.

या धमकीनंतर सोमवारी सकाळी गाझापट्टीतून इस्रायलच्या स्देरॉत शहरावर तीन रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांवर संताप व्यक्त करून इस्रायलने हमासला त्वरीत रॉकेट हल्ले रोखण्याची सूचना केली. हल्ले थांबले नाही तर रात्रीच्या अंधारात हमासच्या ठिकाणांवर भीषण हल्ले चढविले जातील, असा सज्जड इशारा इस्रायलने दिला आहे.

leave a reply