नेपाळच्या सीमेवर भारतीय नागरिकांवर पुन्हा गोळीबार

- एकाची प्रकृती चिंताजनक

किशनगंज – भारत-नेपाळ सीमेवरील बिहारच्या किशनगंज भागात नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. गेल्या महिन्याभरात नेपाळला लागून असलेल्या सीमाभागातील ही दुसरी घटना ठरते. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने चीनच्या इशाऱ्यावर प्रसिद्ध केलेला नवा नकाशा आणि याद्वारे उकरून काढलेल्या सीमावादानंतर सीमेलगतच्या भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील तेहरागच्छ येथील फतेहपूर येथील भारत-नेपाळ सीमेवर ही घटना घडली. नेपाळच्या पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला असून यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव जितेंद्र कुमार आहे. ह्या घटनेनंतर सीमेलगतच्या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावकरी आणि नेपाळ आर्म्ड फोर्स यांच्यात एक बैठक पार पडेल, अशी माहिती सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

गेल्या महिन्यात नेपाळच्या पोलिसांनी सीतामढी लगतच्या सीमेवर केलेल्या गोळीबारात एक व्यक्तीचा बळी गेला होता. तर चार जण जखमी झाले होते. या गोळीबारावर संताप व्यक्त करुन ग्रामस्थांनी नेपाळच्या सीमेवर मृतदेह ठेवून आंदोलन केले होते. गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि नेपाळमध्ये सीमावाद पेटला आहे. चीनच्या आदेशांचे पालन करणाऱ्या नेपाळने भारताच्या सीमेवर अधिकार सांगू नये, असे भारताने बजावले होते. तर नेपाळच्या जनतेनेही आपल्याच पंतप्रधानांविरोधात निदर्शने छेडली होती. त्याचबरोबर पंतप्रधान ओली यांनी नेपाळचा सार्वभौम भूभाग चीनच्या हवाली केल्याची टीका केली होती.

leave a reply