अमेरिका व कॅनडात चीनविरोधात जोरदार निदर्शने

वॉशिंग्टन/टोरंटो – कॅनडाच्या टोरंटो शहरातील चीनच्या दूतावासासमोर चीनविरोधी निर्दशने झाली. कॅनडातले भारतीय, कॅनेडियन नागरिक तसेच इराणी व व्हिएतनामींनी ‘फ्री तिबेट’, ‘फ्री हाँगकाँग’ आणि लडाखमधील चीनच्या आक्रमकतेविरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधल्या चिनी दूतावासासमोर भारतीय वंशाच्या अमेरिकन्सनी चीनविरोधात जोरदार निर्दशने केली.

America-Canadaकोरोनाव्हायरसची साथ आणि लडाखमध्ये चीनने भारताचा विश्वासघात केल्यानंतर जगभरातला भारतीय समुदाय आक्रमक झाला आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि जपानमधल्या भारतीयांनी चीनविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला भारतीयांसोबत इतर देशांच्या नागरिकांचादेखील प्रतिसाद मिळत आहे.

कॅनडाच्या टोरंटोमधल्या चिनी दूतावासासमोर १०० हून अधिकजणांनी चीनविरोधात निदर्शने केली. यामध्ये कॅनेडियन नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी तिबेट, हाँगकाँग आणि लडाखसह उघुरवंशियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातही आवाज उठविण्यात आला. तर, इराणच्या राजवटीने इराण चीनला विकायला काढला आहे, अशी जळजळीत टीका इराणी वंशाच्या नागरिकांनी केली. तसेच कॅनडाच्या सरकारने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, अशी मागणी कॅनेडियन नागरिकांनी केली.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये चिनी दूतावासाबाहेर भारतीयांनी शांततेत निदर्शने केली. चीनच्या लडाखमधील आक्रमकतेविरोधात ही निदर्शने होती. या निदर्शनांमध्ये चीनविरोधी फलक घेऊन आंदोलक उभे होते. ‘चीनच्या व्हायरसने जगातल्या लाखोजणांचा बळी घेतला. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली’, असा आरोप आंदोलकांनी केला.

America-Canada‘चीनने लडाखमध्ये घुसखोरी करुन २० भारतीय सैनिकांना मारले. कोरोनाव्हायरसपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीन भारत व इतर लहान देशांवर दादागिरी करीत आहे; याचा आम्ही निषेध करतो’, असे हे निदर्शनकर्ते संतापाने बोलत होते. ‘चीन साऊथ चायना सीवरही हक्क दाखवून लहान देशांना धमकावत आहे. जगाने चीनविरोधात एकत्र येऊन चीनला एकटे पाडावे’, अशी मागणी या निदर्शनकर्त्यांनी केली.

त्यापूर्वी, ब्रिटनमध्ये लंडनमधील चीनच्या दूतावासासमोर चीनच्या विस्तारवादाचा निषेध करण्यासाठी लंडनमधील भारतीयांनी निदर्शने केली होती. यात पाकिस्तानी व इराणी नागरिकही सहभागी झाले होते.

leave a reply