दोन्ही कोरियन देशांच्या सागरी सीमेवर गोळीबार

कोरियन क्षेत्रात तणाव

north-korea-south-korea maritimeसेऊल – वादग्रस्त सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा परस्परांवर आरोप करून उत्तर आणि दक्षिण कोरियन देशांच्या नौदलामध्ये गोळीबार झाला. १२ वर्षांपूर्वी दोन्ही कोरियन देशांच्या नौदलात याच क्षेत्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दक्षिण कोरियन नौदलाच्या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. यामध्ये ४६ जवानांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या घटनेनंतर कोरियन क्षेत्रात पुन्हा तणाव निर्माण झाला होता.

korea mapसोमवारी पहाटे ३ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास ‘नॉर्दर्न लिमिट लाईन-एनएलएल’ या कोरियन सागरी सीमेजवळ गोळीबाराची घटना घडली. वारंवार इशारे देऊनही उत्तर कोरियाच्या व्यापारी जहाजाने दक्षिण कोरियाच्या सागरी क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे कम्युनिस्ट कोरियन जहाजाला रोखण्यासाठी वॉर्निंग शॉट्सचा मारा करावा लागला, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे. सुमारे ९० मिनिटानंतर उत्तर कोरियाच्या नौदलाने दक्षिण कोरियन जहाजाच्या दिशेने दहा तोफगोळे डागले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे.

पण यामुळे २०१० सालच्या आठवणी ताज्या झाल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे. बारा वर्षांपूर्वी याच एनएलएल क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या दक्षिण कोरियन जहाज तसेच या क्षेत्रातील बेटावर उत्तर कोरियन नौदलाने जोरदार हल्ला चढविला होता. पुढच्या काही तासात या क्षेत्रात गस्तीसाठी तैनात असलेल्या दक्षिण कोरियन नौदलाच्या विनाशिकेला जलसमाधी मिळाली होती. यामध्ये नौदल अधिकाऱ्यांसह ४६ जवानांचा बळी गेला होता. उत्तर कोरियाने टॉर्पेडो प्रक्षेपित करून आपल्या जहाजावर हल्ला चढविल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला होता. त्यामुळे सोमवारच्या घटनेनंतर दोन्ही कोरियन देशांमध्ये सागरी वादावरुन नवा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

गेल्या दीड वर्षापासून उत्तर कोरियाने आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीची तीव्रता वाढविली आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने ४१ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. तसेच उत्तर कोरियाने आपल्या कायद्यात बदल करून आपला देश अण्वस्त्रसज्ज असल्याची घोषणा करून टाकली. उत्तर कोरियन हुकूमशहा किम जाँग-उन यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाच तर शत्रूदेशावर अणुहल्ला चढविण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. उत्तर कोरियाच्या या धमकीमुळे या क्षेत्रातील तणाव वाढला असून दक्षिण कोरियाबरोबरच जपान देखील याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

leave a reply