अणुकार्यक्रमासंबंधी गोपनीय माहिती प्रसिद्ध करून हॅकर्सचा इराणला धक्का

iran protestतेहरान/दुबई – ‘पाश्चिमात्य देशांप्रमाणे आम्ही इराणच्या गुन्हेगार नेत्यांशी जवळीक साधत नाही. आम्ही जे वचन देतो, अगदी १०० टक्के तसेच करतो’, असे सांगून हॅकर्सनी इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधीची गोपनीय माहिती सोशल मीडियावर सार्वजनिक केली. इराणच्या राजवटीने तुरुंगात टाकलेले राजकीय नेते व निदर्शकांची सुटका करा, अशी मागणी करून या हॅकर्सनी इराणला २४ तासांची मुदत दिली होती. पण इराणने मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर हॅकर्सनी अणुकार्यक्रमाशी संबंधित गोपनीय माहिती प्रसिद्ध करून इराणला धक्का दिला. इराणने या प्रकरणात दुसऱ्या देशांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवला आहे.

गेल्या आठवड्यात २१ ऑक्टोबर रोजी ‘ब्लॅक रिवॉर्ड’ या हॅकर्सच्या गटाने इराणमधील इब्राहिम रईसी यांच्या सरकारला उद्देशून इशारा प्रसिद्ध केला होता. इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी गोपनीय दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा या हॅकर्सनी केला होता. सदर दस्तावेज जगजाहीर होऊ नये, असे वाटत असेल तर इराणच्या राजवटीने तुरुंगात डांबलेले सर्व राजकीय नेत्यांची व निदर्शकांची सुटका करावी, अशी मागणी केली होती. पुढच्या २४ तासांमध्ये इराणच्या राजवटीने ही कारवाई करावी, अशी धमकी या गटाने दिली होती.

iran nuclear cyber hackइराणने मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर शनिवारी या हॅकर्सनी सोशल मीडियावर इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधीची गोपनीय माहिती उघड केली. यामध्ये इराणच्या अणुऊर्जा निर्मिती आणि विकास कंपनीने देशी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी केलेल्या करारांचे दस्तावेज आहेत. तसेच बुशहेर अणुप्रकल्पाचे वेळापत्रक, येथील कर्मचारी, इंजिनिअर्सची नावे, मासिक वेतनाचे तपशील आणि बुशहेर अणुप्रकल्पाला भेट देणाऱ्या इराणी तसेच रशियन अधिकाऱ्यांच्या पासपोर्टची माहिती हॅकर्सनी उघड केली.

ब्लॅक रिवॉर्डच्या हॅकर्सनी सदर दस्तावेज प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित क्षेत्रातील जगभरातील विश्लेषकांना यावर संशोधन करण्याचे आवाहन या हॅकर्सनी केले. तसेच लवकरच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतची अधिक माहिती उघड केली जाईल, अशी घोषणा या हॅकर्सनी केली होती. तर इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचे मॅनेजर्स आणि कामगारांचे ईमेल्स हॅक केल्याचे या गटाने म्हटले होते. त्यामुळे येत्या काळात इराणच्या गोपनीय अणुप्रकल्पाबाबत अधिक दस्तावेज हॅकर्सचा गट उघड करू शकतो, असा दावा केला जातो.

इराणमध्ये राजवटीच्या विरोधात भडकलेली निदर्शने आणि अणुप्रकल्पांचे ईमेल्स गहाळ करणारे हॅकर्स परदेशी असल्याचा आरोप इराण करीत आहे. परदेशी गटांनी हे ईमेल्स हॅक करून प्रसिद्ध केल्याचा ठपका इराणने ठेवला. पण याबाबत थेट कोणत्याही देशाचा उल्लेख करण्याचे इराणने टाळले. मात्र इराण परदेशी उल्लेख करीत असलेला ब्लॅक रिवॉर्ड हा इराणी हॅकर्सचा गट असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे इराणमधील हॅकर्सचा गट देखील राजवटीच्या विरोधात गेल्याचे स्थानिक विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply