जम्मू व काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद

जम्मू/नवी दिल्ली – जम्मू व काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे जवान असलेल्या लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्ला झाला आणि त्यात हे जवान शहीद झाल्याची माहिती दिली जाते. जम्मू व काश्मीरमध्ये जी२०च्या बैठकीचे आयोजन करण्याची तयारी सुरू असतानाच, झालेला हा हल्ला सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन लष्कराने हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. त्याचवेळी जम्मू व काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात नवी दिल्लीत उच्चस्तरिय बैठका सुरू झाल्या आहेत.

जम्मू व काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीदगुरुवारी दुपारी तीन वाजता लष्कराचे वाहन पुंछ व भिंबर गलीमधून प्रवास करीत असताना, या वाहनाने पेट घेतला. ग्रेनेड हल्ल्यामुळे या वाहनाला आग लागल्याचे कालांतराने स्पष्ट झाले. हा हल्ला झाला त्यावेळी इथे मुसळधार पाऊस सुरू होता व अंधुकता होती. त्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या वाहनावर गोळीबार झाल्याचेही उघड झाले आहे. राष्ट्रीय रायफल युनिटचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले व एक जण जखमी झाला आहे. या जवानावर राजौरीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जम्मू व काश्मीरमध्ये जी२०च्या बैठकीचे आयोजन करून भारताने पाकिस्तानला फार मोठा धक्का दिला होता. हा भारताचा विजय असल्याचे दावे पाकिस्तानी विश्लेषक व माध्यमांनी केले होते. भारताला रोखण्यात पाकिस्तानचे सरकार व लष्कर पूर्णपणे अपयशी ठरल्याची जोरदार टीका सुरू असतानाच, जम्मू व काश्मीरमध्ये हा हल्ला झाला, ही लक्षणीय बाब ठरते. याद्वारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू व काश्मीर सुरक्षित नसल्याचा संदेश देऊ पाहत आहेत. म्हणूनच सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. लष्कराने हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू केला असून यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ड्रोन्सचा देखील वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या एका गटाने हा हल्ला चढविल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जाते. पण अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना या हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत उच्चस्तरिय बैठका सुरू झाल्या असून जम्मू व काश्मीरच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो एससीओच्या बैठकीसाठी ३ ते ५ मे दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची घोषणा होत असतानाच, सदर दहशतवादी हल्ल्याची बातमी आली, याकडे माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply