रशिया-युक्रेन युद्धात अन्नाचा शस्त्रासारखा वापर होत आहे

- ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या प्रमुखांचा आरोप

रशिया-युक्रेनरोम/मॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन युद्धात अन्नाचा वापर शस्त्राप्रमाणे होत असल्याचा आरोप ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे प्रमुख डेव्हिड बिसले यांनी केला आहे. अमेरिकी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरात बिसले यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये अन्नपुरवठा सुरळीत होणे सध्याच्या स्थितीत शक्य नसल्याचेही सांगितले. जर्मनीच्या कृषीमंत्र्यांनीही याच स्वरुपाचे वक्तव्य करताना रशिया युक्रेनमधील कृषीव्यवस्था व पुरवठा साखळी उद्ध्वस्त करीत असल्याचा दावा केला. रशियन हल्ल्यांमुळे होणारे नुकसान रोखायचे असेल तर युक्रेनला अधिकाधिक शस्त्रपुरवठा करायला हवा, अशी मागणीही जर्मन कृषीमंत्र्यांनी केली.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत युक्रेनमधील हजारो ठिकाणांवर हल्ले चढविण्यात आले असून त्यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. रशिया व युक्रेन हे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्रेडबास्केट’ म्हणून ओळखण्यात येतात. मात्र रशियाच्या कारवाईनंतर या दोन्ही देशांमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. युक्रेनमधील अनेक पिके तसेच हजारो एकर शेतजमीन नष्ट झाली आहे. या वर्षी तसेच पुढील वर्षी युक्रेनच्या अनेक भागांमध्ये शेती करता येणार नाही, असे स्थानिक यंत्रणांकडून सांगण्यात आले.

रशिया-युक्रेनया पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ तसेच जर्मन कृषीमंत्र्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी आहेत. अमेरिकेच्या ‘सीबीएस’ वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’चे प्रमुख बिसले यांना रशियाच्या हल्ल्यांसंदर्भात प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना बिसले यांनी, रशिया युक्रेनमधील अन्नधान्याच्या कोठारांवर हल्ले करीत असल्याचा आरोप केला. अन्नधान्याचा साठा असलेल्या जागांवर होणारे हल्ले ही बाब अन्नाचा शस्त्रासारखा वापर होतो, हे दाखवून देते असे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या प्रमुखांनी म्हटले आहे.

जर्मनीचे कृषीमंत्री सेम ओझ्देमिर यांनीही रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेले युद्ध हा आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला असल्याची टीका केली. ही टीका करतानाच रशिया युक्रेनमधील शेतजमीन व कृषी क्षेत्राशी निगडित यंत्रणांवर जाणूनबुजून हल्ले करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण होणारी अन्नटंचाई रोखायची असेल तर युक्रेनला अधिकाधिक शस्त्रपुरवठा करायला हवा, अशी मागणीही ओझ्देमिर यांनी केली.

leave a reply