इस्रायलची इराण विरोधातील छोटी हालचालही प्रत्युत्तराला आमंत्रण देईल

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

तेहरान – ‘आखातातील अरब देशांबरोबरचे संबंध सुरळीत करण्यासाठी इस्रायलच्या सुरू असलेल्या हालचाली इराणची गुप्तचर यंत्रणा आणि लष्करापासून अजिबात लपलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत इस्रायलने इराणच्या विरोधात छोटीशीही हालचाल केली तरी त्याला इराणचे प्रत्युत्तर मिळेल. इराणचे लष्कर इस्रायलमध्ये दाखल होईल’, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी दिला. दरम्यान, अरब देशांमध्ये लपलेले इस्रायली गुप्तचर यंत्रणांचे हेर इराणविरोधात कारस्थाने आखत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच इराणच्या अधिकार्‍यांनी केला होता.

इराण विरोधातील छोटी हालचालसोमवारी इराणच्या लष्कराचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने लष्कराला संबोधित करताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला धमकावले. इस्रायलने इराणविरोधी कारवाईसाठी हालचाल जरी केली तरी इराणचे लष्कर इस्रायलमध्ये शांती प्रस्थापित होऊ देणार नाही, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी दिली. इराणचे लष्कर थेट इस्रायलमध्ये घुसतील, अशी लक्षवेधी घोषणा राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केली. गेल्या काही दिवसांमधील इराणच्या हालचाली लक्षात घेता, राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी इराकला उद्देशून इशारा दिला होता. इराकच्या भूभागाचा वापर इराणविरोधी कारवाईसाठी होणार नाही, याची पुरेपूर काळजी इराकने घ्यावी, असे सांगून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इरबिलमध्ये झालेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले होते. इरबिल ही इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी आहे. गेल्या महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स पथकाने कुर्दिस्तानच्या इरबिल शहरावर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. या हल्ल्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे सेफ हाऊस अर्थात छुपा तळ उडवून दिल्याचा दावा इराणने केला होता. तसेच आखाती-अरब देशांमध्ये इस्रायली एजंट्सच्या हालचाली खपवून घेणार नसल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सने बजावले होते.

त्यापाठोपाठ इस्रायलच्या ‘मिलिटरी अटॅचे’ अर्थात लष्करी अधिकार्याला आपल्या देशात परवानगी देणार्‍या बाहरिनलाही इराणने धमकावले होते. इराणच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या या तैनातीसाठी बाहरिनला इरबिलसारखे परिणाम भोगावे लागतील, असे इराणने बजावले होते. तर काही तासांपूर्वी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. इराणच्या या हालचाली फारच धोकादायक असल्याचा इशारा इस्रायलचे लष्करी विश्लेषक देत आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी इस्रायलला दिलेला इशारा देखील तितकाच गंभीर असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून अधिक आक्रमक बनल्याचे इस्रायली विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. काही आठवड्यांपूर्वी इस्राइलमध्ये पार पडलेली नेगेव्ह परिषद इराणच्या या धमकीसत्रासाठी कारणीभूत असल्याचा दावा केला जातो. युएई, बाहरिन, मोरोक्को आणि इजिप्त या देशांनी नेगेव्ह परिषदेत सहभाग घेऊन इस्रायलबरोबरील संरक्षणविषयक सहकार्यासाठी पुढाकार घेतला होता. तर येत्या काळात या सहकार्याचा विस्तार होईल. जॉर्डन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया हे देशही यात सहभागी होतील व अरबांची नाटोसारखी संघटना उभी राहील, असा इशारा इराणी वृत्तसंस्थेने दिला होता.

leave a reply