भारतात हेरगिरीसाठी पाकिस्तानकडून बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा वापर – बंगळुरूमधील बेकायदा टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केल्यावर खुलासा

बंगळुरू – लष्कराच्या पूर्व भारतातील एका तळावर आलेल्या काही संशयास्पद फोनचा मागोवा काढताना बुधवारी बंगळुरूमधील एका बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश झाला. यानंतर चौकशीत कित्येक धक्कादायक खुलासे होत आहेत. आंतरराष्ट्रीय फोन कॉलला या अवैध टेलिफोन एक्सचेंजद्वारे स्थानिक कॉलमध्ये परिवर्तीत करून भारतात पाकिस्तानकडून हेरगिरी करण्यात येत होती. पाकिस्तानने भारतातील इतर भागातही असे अवैध टेलिफोन एक्सचेंज आपल्या हस्तकांच्याद्वारे सुरू केलेले असावेत, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Advertisement

टेलिफोन एक्सचेंजबुधवारी भारतीय लष्कराच्या इंटेलिजन्स विभागाने, बंगळुरू पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने शहरात सहा ठिकाणी छापे टाकून अवैध टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केले. एप्रिल महिन्यात पूर्व भारतात लष्कराच्या एका तळावर फोनकॉल आला होता. या फोनमधून समोरील व्यक्तीने वरीष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करून लष्कराची काही माहिती विचारली होती. या कॉलबाबत संशय आल्यानंतर लष्कराच्या गुप्तचर विभागाने या कॉलचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. चौकशीत लष्कराच्या विविध विभागांना गेल्या काही दिवसात असे फोन आल्याचे व तेथून माहिती मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे याची आणखी सखोल चौकशी सुरू झाली. या तपासातून बंगळुरूतील अवैध टेलिफोन एक्सचेंजचा खुलासा झाला.

बंगळुरू पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभागाच्या सहाय्याने या टेलिफॉन एक्सचेंजवर बुधवारी कारवाई केली. शहरातील सुमारे सहा ठिकाणाहून 32 ‘सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल’ (सीम) बॉक्स जप्त करण्यात आले. या सीम बॉक्सद्वारे 960 सीम कार्ड एकावेळी वापरले जाऊ शकतात.

टेलिफोन एक्सचेंजसीम बॉक्स या हार्डवेअर उपकरणाचा वापर ‘ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन’चा (जीएसएम) संपर्क टर्मिनेशन अर्थात थांबविण्यासाठी केला जातो. यासाठी ‘मायग्रेशन’ नावाने ओळखले जाणारे तंत्रज्ञान वापरले जाते. याद्वारे सीमचे कित्येक जीएसएम गेटवे बनतात आणि यातून युजर सतत भ्रमण करीत असल्याचा भ्रम तयार केला जातो. सेवा पुरवठादार कंपन्यांकडून सीम ब्लॉक होऊ नये आणि सरकारी यंत्रणांकडून पकडले जाऊ नये म्हणून असे तंत्रज्ञान वापरले जाते.

चौकशीत पाकिस्तानमधील विविध गुप्तचर विभाग भारतीय नागरिकांशी संपर्क करण्याकरिता आणि लष्करी संस्थाकडून माहिती मिळविण्याकरिता अशा अवैध टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून कॉल करीत असल्याचे लक्षात आले आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने इंटरनेट कॉलला सामान्य स्थानिक कॉलमध्ये परावर्तीत करणार्‍या अशा अवैध एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्याची कार्यपद्धती अवलंबली आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

लष्कराच्या विभागांना अशा हेरगिरीपासून वाचण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि स्टँडर्ड आपरेशन प्रोसिजर (एसओपी) आखून देण्यात आली आहे. मात्र सामान्य नागरिक व कर्मचारी अशा जाळ्यामध्ये अडकतात. इब्राहिम मुल्लाती बिन मोहम्मद कुट्टी याला मालाप्पुरम्मधून या प्रकरणात अटक केली आहे. तसेच तमिळनाडूच्या त्रूपुरमधून गौतम विश्‍वानाथ याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असून देशातील इतर भागातही हेरगिरीसाठी असे अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरू आहेत का?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

leave a reply