अतिवृष्टीमुळे मुंबईच्या मालाडमध्येे इमारत कोसळून 11 जणांचा बळी

मुंबई – मुंबईच्या मालडमधील मालवणी भागात खचलेली तीन मजली इमारत शेजारील दोन मजली इमारतीवर कोसळून झालेल्या विचित्र दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 8 लहान मुलांचा समावेश आहे. या इमारतीचे बांधकाम बेकायदा होते, असे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईतील बेकायदा बांधकाम आणि जर्जर झालेल्या इमारतींबाबत प्रश्‍न पुन्हा उपस्थित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचवेळी राज्य सरकारनेही मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित केली आहे.

Advertisement

11 जणांचा बळीमंगळवार रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे बुधवारी रात्री मुंबईतील मालाडमधील मालवणीच्या गेट नंबर8 येथील न्यू कलेक्टर कंपाऊंड भागातील एका चार मजली बेकायदा इमारतीचा मोठा भाग कोसळला. हा भाग शेजारील दोन मजली घरावर कोसळल्याने हे घरही ढिगार्‍याखाली आहे. तसेच धक्क्यांनी आजूबाजूच्या आणखी दोन घरांची पडझड झाली. या सर्व ढिगार्‍याखाली सुमारे 30 जण गाढले गेले होते. रात्री उशीरा बचावकार्य सुरू झाले, तसेच गुरुवारी पहाटेनंतर बचावकार्याला वेग आला. 18 जणांना ढिगार्‍याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले. मात्र 11 जणांचे प्राण गेले.

दुर्घटनेत बळी गेलेल्यांमध्ये तीन ते 15 वर्षांमधील आठ मुलांचा, तसेच तीन महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे. या विचित्र दुर्घटनेनंतर बेकायदा बांधकांमाबाबत प्रश्‍न उपस्थित राहत आहे. यानंतर मुंबई महापालिकेने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वाहतूक सेवा पुन्हा विस्कळीत झाली. विमानसेवाही ठप्प होती. मुंबईत 12 तासात 222.2 एमएम पावसाची नोंद झाली असून जूनमध्ये होत असलेल्या सरासरी पावसाच्या 44 टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात मुंबईत सरासरी 505 एमएम पाऊस होतो. 1991 साली चोवीस तासात 399 एमएम पाऊस झाला होता. त्यानंतर जून महिन्यात एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस बुधवारी झाला. पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामानखात्याने दिला असून याकाळात 200 एमएम पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफची पथके मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत.

leave a reply