‘अटल टनेल’मधून प्रथमच लष्कराचा ताफा ‘एलएसी’पर्यंत दाखल

श्रीनगर – ‘अटल टनेल’ हा मानली-लेहला बारा महिने जोडणारा भुयारी मार्ग खुला झाल्यनंतर प्रथमच भारतीय लष्कराच्या ताफा यामार्गाने ‘एलएसी’पर्यंत पोहोचला. युद्धकाळात सैनिक व संरक्षण साहित्याची जलदगतीने वाहतूक करण्याच्या दृष्टीने या भुयारी मार्गाचे सामरिक महत्व अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘अटल टनेल’चे उद्घाटन केले होते. तर चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधून या भुयारी मार्गाचा यद्धकाळात भारताला लाभ होणार नाही,अशी धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘अटल टनेल’मधून लष्करी वाहनाचा ताफा या मार्गाने ‘एलएसी’पर्यंत दाखल झाला.

‘अटल टनेल’

मनाली-केलोंग-लेह हा ४७५ किमी लांबीचा महामार्ग बनविण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयत्नांमध्ये ‘अटल टनेल’ हा एक महत्त्वाचा टप्पा होता. हिवाळ्यात या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने हा भाग इतर भागापासून तुटतो. मात्र या भुयारी मार्गामुळे वर्षाचे बारा महिने मानली व लेह जोडले जाणार आहेत. हा बोगदा तयार करण्यासाठी तब्बल १० वर्ष लागली. समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवर उभारण्यात आलेला ८.८२ किलोमीटर लांबीचा हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा आहे.

‘अटल टनेल’चीन आणि पाकिस्तान बरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘अटल टनेल’चे काम पूर्ण झाल्याने लष्कराला मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. या भुयारी मार्गामुळे संघर्ष काळात कमी वेळेत ‘लाईन ऑफ अँक्चुअल कंट्रोल’पर्यंत (एलएसी) लष्करी वाहने आणि लष्कराच्या जवानांना कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. लष्करी वाहनांबरोबर रणगाडे सुद्धा या टनेलमधून जाऊ शकणार असल्याने या भुयारी मार्गाचे महत्व अधोरेखित होते.

३ ऑक्टोबर रोजी या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आल्यावर पर्यटकांसाठी हा बोगदा खुला करण्यात आला होता. उद्घाटनानंतर पाच दिवसातच लष्कराचा ताफा या बोगद्यातून मार्गस्थ झाला. या टनेलमुळे सीमक्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

leave a reply