परराष्ट्रमंत्री जयशंकर ब्रिटनच्या दौर्‍यावर जाणार

नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पुढच्या आठवड्यात ब्रिटनमध्ये होणार्‍या जी७ देशांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनसह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, आणि अमेरिका व युरोपिय महासंघाबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका या देशांचे परराष्ट्रमंत्रीही सदर परिषदेत उपस्थित असतील. यावेळी कोरोनाच्या साथीमुळे उद्भलेल्या भीषण समस्येवर चर्चा अपेक्षित आहे.

पुढच्या महिन्यात जी७ देशांच्या प्रमुखांची बैठक पार पडणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या बैठकीसाठी भारताच्या पंतप्रधानांनाही आमंत्रण दिले आहे. सदर बैठकीच्या आधी ब्रिटनचे पंतप्रधान भारताला भेट देणार होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून पंतप्रधान जॉन्सन भारतात दाखल होणार होते. पण त्यावेळी ब्रिटनमध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला. त्यानंतर भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांना पुन्हा एकदा आपली भारत भेट रद्द करावी लागली होती.

मात्र पुढच्या महिन्यात होणार्‍या जी७ परिषदेत भारत व ब्रिटनच्या पंतप्रधानांची द्विपक्षीय सहकार्यावर सखोल चर्चा अपेक्षित आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या ब्रिटन भेटीत याची पूर्वतयारी केली जाईल. भारतात कोरोनाचे संकट भीषण स्वरुप धारण करीत असताना, ब्रिटनने भारताला आवश्यक असलेले सहाय्य रवाना केले आहे. तसेच पुढच्या काळातही ब्रिटन भारताला सहाय्य पुरविल, अशी घोषणा ब्रिटनने केली आहे.

leave a reply