म्यानमारमध्ये जुंटा राजवटीच्या कारवाईत सात जणांचा बळी

यांगून – म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधात निदर्शने करणार्‍या जमावावर लष्कराने केलेल्या गोळीबारात सात निदर्शकांचा बळी गेला. याबरोबर चौथ्या महिन्यात पोहोचलेल्या म्यानमारमधील निदर्शनांमध्ये गेलेल्या बळींची संख्या ७६६ वर गेली आहे. जुंटा राजवटीच्या विरोधातील या निदर्शने तीव्र करण्यासाठी म्यानमारमधील गटांनी जगभरात ‘स्प्रिंग रिव्होल्युशन’चे आवाहन केले आहे. त्यानुसार रविवारी म्यानमारसह अमेरिकेच्या न्यूयॉर्क तर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात म्यानमारमधील लोकशाहीच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित करण्यात आली होती.

१ फेब्रुवारी रोजी सकाळी म्यानमारच्या जुंटा राजवटीने आँग सॅन स्यू की आणि लोकशाही सरकारच्या नेत्यांना अटक करून देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. तेव्हापासून आपल्या नेत्यांची सुटका आणि लोकशाहीची मागणी करणार्‍यांनी म्यानमारमध्ये पुकारलेल्या निदर्शनांना शनिवारी तीन महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने या लोकशाहीवादी गटांनी एकत्र येऊन म्यानमारपूरते मर्यादित असलेले हे आंदोलन जागतिक करण्याची घोषणा केली व त्यासाठी ‘स्प्रिंग रिव्होल्युशन’ पुकारले आहे. या स्प्रिंग रिव्होल्युशनने सारे जग हादरवून सोडा, असे आवाहन या म्यानमारच्या नेत्यांनी केले.

म्यानमारमधील निदर्शकांनी रविवारी लष्कराने लादलेले संचारबंदीचे आदेश धुडकावून यंगून, वेटलेट तसेच शान, हाकांत अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने निदर्शने केली. म्यानमारच्या लष्कराने या निदर्शकांवर केलेल्या कारवाईत किमान सात जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. याशिवाय सोशल मीडियातून या निदर्शनांचे आवाहन करणार्‍या एका तरुणीला लष्कराने ताब्यात घेतले आहे. याशिवाय लष्कराने पाच तरुणींचे अपहरण केल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. याआधीही लष्कराने अशाप्रकारे निदर्शनांचे नेतृत्व करणार्‍या तरुण-तरुणींना अटक केली होती. यातील काही जणांवर अत्याचार केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

म्यानमारमधील गटांनी पुकारलेल्या या ‘स्प्रिंग रिव्होल्युशन’ला आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये साधारण दीडशेहून अधिक जणांनी एकत्र येऊन म्यानमारमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित करा, अशी मागणी केली. तर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातही अशाच प्रकारे निदर्शने झाली. यामध्ये म्यानमारी वंशाच्या नागरिकांसोबत आग्नेय आशियाई तसेच काही ऑस्ट्रेलियन नागरिकांनीही सहभाग घेतला होता.

म्यानमारमधील परिस्थिती अतिशय बिकट बनत चालली आहे. म्यानमारचे लष्कर दहशतवाद्यांसारखी कारवाई करीत असल्याची टीका स्थानिक नेते व नागरिक सोशल मीडियाद्वारे करीत आहेत. तर म्यानमारच्या लष्कराविरोधात या देशातील सशस्त्र बंडखोर संघटना एकत्र आल्या आहेत. काही भागात नव्या सशस्त्र संघटना उभ्या राहू लागल्या असून लष्करी अधिकार्‍यांचे ‘वॉन्टेड’ म्हणून पोस्टर्स रस्त्यांवर लावले जाऊ लागले आहेत. याशिवाय या बंडखोर संघटनांनी लष्कराच्या तळांवर हल्ले सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे म्यानमारमधील निदर्शनांचे रुपांतर गृहयुद्धात होऊ लागल्याचे दिसत आहे.

leave a reply