परराष्ट्रमंत्री झरिफ यांच्या ऑडिओ टेपमुळे इराणमध्ये उलथापालथ

तेहरान – इराणच्या परराष्ट्र धोरणांवर रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स, कासेम सुलेमानी यांची पकड होती, असे विधान करून परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी इराणमध्ये राजकीय भूकंप घडविला आहे. राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी सदर मुलाखत जगजाहीर करणार्‍या अभ्यासगटाच्या प्रमुखाचा राजीनामा घेतला. तर या ऑडिओ टेपच्या लीकशी जोडलेल्या १५ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्यापेक्षाही हा मोठा हल्ला असल्याचा दावा इराणी विश्‍लेषक करीत आहेत. यानंतर राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि परराष्ट्रमंत्री झरिफ यांच्या कार्यालयांवर रिव्होल्युशनरी गार्डस्च्या धाडी पडल्याचा दावा कॅनडास्थित इराणी संकेतस्थळाने केला आहे. या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज्’ या अभ्यासगटाने गेल्या वर्षी परराष्ट्रमंत्री झरिफ यांची मुलाखत घेतली होती. सुमारे सात तास लांबलेल्या या मुलाखतीत झरिफ यांनी इराणच्या राजकारणात मुत्सुद्देगिरीला असलेली मर्यादा परखड शब्दात मांडल्या होत्या. गेले वर्षभर या मुलाखतीतला एकही शब्द प्रसिद्ध झाला नव्हता. पण चार दिवसांपूर्वी लंडनस्थित पर्शियन भाषिक वृत्तवाहिनीने झरिफ यांच्या मुलाखतीची ऑडिओ टेप लीक केली.

यामध्ये झरिफ यांनी रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) ही लष्करी संघटना इराणच्या राजकारणात सर्वात प्रभावी ठरत असल्याचा आरोप केला. तर कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख कासेम सुलेमानी हे हयात असताना, इराणचे परराष्ट्र धोरण ठरवत होते, अशी टीका झरिफ यांनी या ध्वनीफितीमध्ये केली होती. सुलेमानी यांनी रशियाच्या साथीने अमेरिका व इराणच्या सरकारमध्ये झालेला अणुकरार मोडीत काढण्याचे प्रयत्न केले होते तसेच सिरियातील संघर्ष लांबवून इराणच्या हितसंबंधांना धोका निर्माण करण्याचाही प्रयत्न सुलेमानी यांनी केल्याचा ठपका झरिफ यांनी ठेवला होता.

आयआरजीसी व सुलेमानी यांच्याबाबत केलेल्या या विधानांमुळे इराणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. इराणच्या संसदेत झरिफ यांच्या राजीनाम्याची तसेच त्यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची मागणी केली जात आहे. ही टेप लीक झाल्यापासून परराष्ट्रमंत्री झरिफ इराणमध्ये आलेले नाहीत. ते सध्या कुवैतच्या दौर्‍यावर आहेत.

राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी सरकारी गुप्तचर विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर अभ्यासगटाचे प्रमुख हेशामोद्दिन अशेना यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर या अभ्यासगटातील या ऑडिओ लीकशी जोडलेल्या १५ कर्मचार्‍यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईसाठी अशेना यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यातच ‘आयआरजीसी’च्या लष्करी गुप्तचर यंत्रणेने राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि परराष्ट्रमंत्री झरिफ यांच्या सरकारी कार्यालयांवर धाडी टाकून महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याचा दावा कॅनडातून चालविल्या जाणार्‍या इराणी संकेतस्थळाने केला. पण इराणी माध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत किंवा इराणच्या यंत्रणांनीही याला दुजोरा दिलेला नाही.

leave a reply