भारत-चीन संबंधांचा पाया हादरला आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

मॉस्को – शेजारी देशांमध्ये सलोखा कायम राहण्यासाठी सीमेवर सौहार्द अपेक्षित असते. पण गेल्या वर्षापासून भारत-चीन सीमेवर तणाव निर्णाण झाला आहे आणि 45 वर्षानंतर पहिल्यांदाच या सीमेवर सैनिक शहीद झाले आहेत. यामुळे भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांचा पाया हादरला आहे, अशा नेमक्या शब्दात रशियाच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. त्याचवेळी दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात जगातील सर्वात भक्कम व प्रगल्भ संबंध म्हणून भारत-रशियाचा दाखला देता येईल, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारत-चीन संबंधांचा पाया हादरला आहे - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरगुरुवारी रशियाच्या ‘प्रिमॅकोव्ह नॅशनल रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स इन मॉस्को’मध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनबरोबरील संबंधांवरून प्रश्‍न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात दोन्ही देशांमधले तणाव निर्माण झाल्याचे सांगून याला चीनची आक्रमकता कारणीभूत असल्याची बाब परराष्ट्रमंत्र्यांनी राजनैतिक भाषेत मांडली. पाश्‍चिमात्यांच्या चीन व रशियाविरोधी क्वाड संघटनेत भारताने सहभागी होऊ नये, असे आवाहन रशियाकडून केले जात आहे. मात्र चीनची आक्रमकता लक्षात घेता, भारत या आघाडीवर तटस्थ राहू शकत नाही, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या व्याख्यानातून करून दिली. तसेच रशियाने चीनवरील आपल्या प्रभावाचा वापर करावा, असेही जयशंकर यांनी नेमक्या शब्दात सुचविले.

भारताच्या चीनबरोबरील विकोपाला गेलेल्या संबंधांची परखडपणे रशियाला जाणीव करून देत असताना, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारत-रशिया संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात अनेक देशांचे द्विपक्षीय सहकार्य विकसित झाले. पण भारत व रशियाचे संबंध सर्वात भक्कम व प्रगल्भ ठरतात. वेळोवेळी हे दोन्ही देशांमधील हे संबंध अधिकाधिक दृढ होत गेले आणि त्याला नव्या सहकार्याची जोड देखील मिळत राहिली, असे सांगून परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

‘भारत व रशियाच्या नेतृत्त्वाने स्वीकारलेल्या भूमिकेचा फार मोठा सकारात्मक परिणाम द्विपक्षीय संबंधांवर होत आहे. 2014 सालापासून आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची 19 वेळा भेट झालेली आहे, ही एकच बाब दोन्ही देशांना या द्विपक्षीय संबंधांचे वाटत असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी ठरेल. भारत व रशियामधील द्विपक्षीय चर्चेसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे’, असेही जयशंकर पुढे म्हणाले.

leave a reply