साडे चार दशकानंतर भारत-चीन सीमेवर झालेल्या गोळीबाराने तणाव वाढला

नवी दिल्ली – साडे चार दशकानंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला. मात्र पहिली गोळी कोणी झाडली, यावर भारत आणि चीनचे लष्कर परस्परांवर दोषारोप करीत आहेत. लडाखमधील पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडे असलेल्या ‘रेजांग ला’ टेकडीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या चिनी जवानांनी इथे गोळीबार केला आणि उभय देशांमध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केले, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. तर चीनच्या लष्कराने भारतीय सैनिकांनी चीनच्या हद्दीत शिरुन वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा कांगावा चीनने केला आहे. पण प्रत्यक्षात चीनचे जवान हातात लोखंडी सळ्या घेऊन ‘रेजांग ला’ येथे गलवानमधील हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीने आले होते. पण भारतीय सैनिकांनी त्यांचा डाव उधळून लावला, ही बाब माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार्‍या टेकड्यांवर भारतीय लष्कराने तैनाती केली आहे. यामुळे भारताच्या हद्दीत घुसखोरी करणे चिनी लष्करासाठी अवघड बनले आहे. पुढच्या काळात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये या क्षेत्रात संघर्ष भडकलाच तर या टेकड्यांवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांकडून चीनला सपाटून मार खावा लागेल. याची जाणीव झालेल्या चीनने सोमवारी ‘रेजांग ला’ ताब्यात घेण्यासाठी गलवानच्या धर्तीवर भ्याड हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. लोखंडी सळ्या, काटेरी तारा इत्यादी हत्यारे घेऊन तयारीनीशी आलेल्या चिनी सैनिकांचे फोटोग्राफ्स भारतीय वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले आहेत. भारतीय सैनिकांनी ‘रेजांग ला’मधून माघार घ्यावी, यासाठी चीनने गोळीबारही केला. मात्र भारतीय सैनिकांच्या निर्धारासमोर चीनच्या जवानांचे काही चालू शकले नाही व त्यांना इथून माघार घ्यावी लागली. मागच्या काही दिवसात चीनच्या जवानांवर अशारितीने माघार घेण्याची नामुष्की बर्‍याच वेळा ओढावल्याचे स्पष्ट झाले होते.

लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांसमोर वारंवार माघार घ्यावी लागत असताना, प्रचार युद्धात मात्र चीन आपण कुठेही कमी पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत आहे. भारतीय सैनिकांनी चीनच्या हद्दीत प्रवेश केला आणि हवेत गोळीबार करुन आपल्या जवानांना उकसविल्याचा आरोप चीनने केला आहे. ही चिथावणीखोर कारवाई असून दोन्ही देशांबरोबर झालेल्या कराराचा भंग असल्याची टीका चीनने केली आहे. त्याचवेळी चीनच्या लष्कराने यावेळी संयम दाखविला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली असे सांगून चिनी लष्कराने स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे. पण संघर्षात भारतीय सैनिकांसमोर चीनच्या जवानांना वारंवार माघार घ्यावी लागत आहे, यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग संतापलेले असल्याचा दावा केला जातो. अत्यंत सामर्थ्यशाली लष्कर अशी चीनच्या ‘पीएलए’ची जगभरात ख्याती होती. मात्र पीएलए’च्या या प्रतिमेला लडाखमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर जबर धक्का बसला आहे. यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष वैतागले असून पीएलए’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याचा फटका बसणार असल्याचे वृत्त आहे.

हिवाळा जवळ आल्याने चीनच्या जवानांना लडाखमधून माघार घ्यावीच लागेल, अन्यथा इथे चीनला फार मोठी हानी सोसावी लागेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या माघारीच्या आधी एखादा हल्ला चढवून फार मोठे यश मिळविल्याचा आभास निर्माण करणे ही चीनची फार मोठी गरज बनली आहे. त्याच्यासाठी चीन शक्य ते सारे प्रयत्न करीत आहे, मात्र ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याने इथल्या चकमकीचे रुपांतर भयंकर युद्धात होऊ शकते, अशी दाट शक्यता समोर येत आहे. भारताने चीनबरोबरील युद्धासाठी तयार रहायला हवे. ही तयारी दाखविली नाही तर, चीन पुढच्या काळात भारताला अधिकाधिक त्रास देतच राहील आणि सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीचे स्वप्न साकार होणार नाही, असे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

leave a reply