तेलंगणामध्ये चकमकीत दोन माओवादी ठार

हैदराबाद – तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडम् जिल्ह्यातील चेरलाच्या जंगलांमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. ठार झालेल्या माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

माओवाद्यांचा कमांडर देवलू उर्फ शंकर काही दिवसांपूर्वी चकमकीत ठार झाला होता. यापार्श्वभूमीवर रविवारी भद्राद्री कोठागुडम् जिल्ह्यात माओवाद्यांनी बंद पुकारला होता. यादरम्यान रविवारी रात्री चेरला मंडल येथे तालीपेरू येथे रस्त्यावर माओवाद्यांनी मोठा भुसुरूंग स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात पोलिसांचे एक पथक थोडक्यात बचावले.

यानंतर पोलिसांनी माओवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी हे माओवादी चेरूलच्या जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचे हे पथक चेरूलच्या जंगलात दाखल झाले. यावेळी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी माओवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

ही चकमक वीस मिनिटे सुरू होती. पोलिसांना चकमकीच्या ठिकाणाहून दोन माओवाद्यांचे मृतदेह सापडले. येथून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या माओवाद्यांचे साथीदार जंगलात पळून जाण्यास यशस्वी ठरले. त्यांना पकडण्याची मोहिम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

leave a reply