युएईबरोबरील मुक्त व्यापारी करारामुळे भारताला मोठा लाभ होण्याचे संकेत

- २६ अब्ज डॉलर्स निर्यातीवरील आयात कर रद्द होणार

नवी दिल्ली – भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) झालेल्या मुक्त व्यापारी करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतातून युएईमध्ये निर्यात होणार्‍या २६ अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर पाच टक्के आयात कर आकारण्यात येतो. व्यापारी करारामुळे हा कर रद्द होणार असून निर्यातीत अधिक भर पडेल, असा दावा भारतीय अधिकार्‍यांनी केला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या कराराची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

युएईबरोबरील मुक्त व्यापारी करारामुळे भारताला मोठा लाभ होण्याचे संकेत - २६ अब्ज डॉलर्स निर्यातीवरील आयात कर रद्द होणारयुएई हा भारताचा तिसर्‍या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश आहे. भारतातून परदेशात होणार्‍या निर्यातीत युएई दुसर्‍या क्रमांकावर आहेत. २०१९-२० च्या आकडेवारीनुसार, भारताकडून युएईमध्ये २९ अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. यात सोने, दागिने, कापड, चामडे, फूटवेअर, क्रीडाविषयक साहित्य, प्लॅस्टिक, फर्निचर, शेती, अभियांत्रिकी उत्पादने, औषधे व गाड्या यांचा समावेश आहे. व्यापारी करारामुळे या सर्व घटकांच्या निर्यातीत वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे अर्थकारण थंडावलेले असताना देखील २०२०-२१ या वित्तीय वर्षात उभय देशांमधील व्यापार ४३ अब्ज डॉलर्सवर गेला होता.

कराराचा सर्वाधिक फायदा सोने, दागिने व कापड यांना होण्याची शक्यता आहे. येत्या दोन वर्षात सोने व दागिन्यांची निर्यात १० अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. तर कापडाची निर्यात पुढील पाच वर्षात दोन अब्ज डॉलर्सने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारत व युएईमधील करारानुसार, भारतातून निर्यात होणार्‍या उत्पादनांमधील जवळपास ९९ टक्के उत्पादने करमुक्त होण्याचे संकेत अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, भारत व युएईमधील मुक्त व्यापारी करारामुळे दहा लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवा क्षेत्रासाठी नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी, व्यापारी, लघु आणि सूक्ष्म उद्योग, स्टार्टअप कंपन्यांना याचा लाभ होईल, असा विश्‍वास व्यापारमंत्री गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत व युएईमधील करारामुळे, दोन देशांमधील व्यापार पुढच्या पाच वर्षात १०० अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. या करारापूर्वी युएईने भारतात सुमारे ७५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि सायबर क्षेत्रात सहकार्य वाढीस लागल्याचेही समोर आले आहे.

leave a reply