बांगलादेशच्या बंदरांमार्गे ईशान्येकडील राज्यात मालवाहतूक – कोलकातावरून मालवाहू जहाज रवाना

Bangladesh-Indiaकोलकाता – कोलकातावरून सागरी मार्गाने बांगलादेशच्या चितगोंग बंदरावर आणि पुढे आगरतळा, असा ईशान्य भारतासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा नवा मार्ग खुला झाला आहे. आगरतळाला जाण्यासाठी कोलकातावरून चितगोंग बंदरासाठीच्या पहिल्या कंटेनर जहाजाला केंद्रीय नौकावहन मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांनी हिरवा कंदील दाखवला. जवळपास ५५ वर्षानंतर ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशचे बंदर वापरायला परवानगी मिळाली आहे. ईशान्य भारतातील राज्ये सागरी मार्गाने बांगलादेश बंदरांमार्फत जोडली जात असल्याने हा ऐतिहासिक दिवस ठरतो, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

भारताच्या ईशान्येकडील राज्यात मालवाहतुकीसाठी बांगलादेशाची बंदरे वापरण्याची परवानगी २०१७ साली बांगलादेशने दिली होती. २०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत भेटीत यासंबंधी करार झाला होता. यानुसार बांगलादेशच्या चितगोंग आणि मोगला बंदरामार्फत ईशान्येकडील राज्यांना मालवाहतूक करण्याचा निर्णय झाला. यानुसार कोलकातामधून बांगलादेशच्या चितगोंग बंदराकडे पहिले ट्रायल कंटेनर जहाज रवाना झाले.

Bangladesh-Indiaचाचणी म्हणून हे कंटेनर जहाज पाठविण्यात आले असले, तरी लवकरच या सागरी मार्गाने ईशान्य भारतात अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरु होईल. याआधी पश्चिम बंगालमधून आगरतळाला जाण्यासाठी बराच वेळ लागायचा. पण बांगलादेशपर्यंत सागरी मार्ग सुरु झाल्याने हा वेळ अर्ध्याने वाचेल. चितगोंग बंदरात माल उतरून तेथून बांगलादेशच्या ट्रक्समधून ईशान्येकडील त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये पाठविण्यात येईल.

या मार्गाने भारत आणि बांगलादेशला नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. हा पर्यायी आणि वेळेची बचत करणारा मार्ग आहे. यामुळे बांगलादेशमार्गे ईशान्येकडील राज्ये जोडली जातील, असे मांडविया म्हणाले. तसेच या मार्गामुळे भारत आणि बांगलादेशमधील सहकार्य आणखी दृढ होईल. रोजगाराच्या संधी, गुंतवणूक आणि व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply