रफायलसाठी ‘पॉवर जनरेशन सिस्टिम’ बनविणाऱ्या फ्रान्सच्या ‘थेल्स’ कंपनीची उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक

लखनऊ – संरक्षण उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तसेच रफायल या लढाऊ विमानांसाठी ‘पॉवर जनरेशन सिस्टिम’ तयार करणाऱ्या फ्रान्सच्या ‘थेल्स’ कंपनीने उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये कॉर्पोरेट ऑफिस उघडले आहे. थेल्स कंपनीकडून कानपूरच्या ‘एमकेयू’ कंपनीच्या सहाय्याने लष्करासाठी ‘नाईट व्हिजन’ उपकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेश सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री (एमएसएमई) सिद्धार्थनाथ सिंह यांनी सांगितले.

‘पॉवर जनरेशन सिस्टिम’

तंत्रज्ञान क्षेत्रासह संरक्षण उपकरणांची निर्मिती करणाऱ्या थेल्सने भारतात कॉर्पोरेट ऑफिस सुरू केल्याने संरक्षण उपकरणाच्या निर्मितीमध्ये उत्तरप्रदेश महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. सध्या थेल्स कंपनीकडून भारतीय लष्करासाठी ‘नाईट व्हिजन रडार’च्या उत्पादनासाठी ‘एमकेयू’ कंपनीबरोबर करार केला आहे. यासह कंपनीकडून रफायल लढाऊ विमानांसाठी अत्याधुनिक उपकरणांची निर्मिती करण्याबाबत देखील विचार करण्यात येत आहे.

साधारण चार महिन्यापूर्वी मायक्रोसॉफ्टने उत्तरप्रदेशमध्ये त्यांचे केद्र उभारले होते. त्यानंतर आता थेल्सकडून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. थेल्स कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेशमध्ये संरक्षण उत्पादनाची अफाट क्षमता असल्याचे सिद्ध होते थेल्सकडून करण्यात आलेली गुंतवणूक उत्तर प्रदेशमधील संरक्षण औद्योगिक कॉरिडोर प्रकल्पातील एक भाग असेल, असे सिंह यांनी म्हटले.

20 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या थेल्स कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात हल, भेल आणि एल ॲण्ड टी कंपनीबरोबर करार केले आहेत. त्यामुळे येत्या काळात उत्तर प्रदेश तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेईल व स्थानिक कौशल्य विकासाला देखील मदत मिळेल, असा दावा केला जातो.

उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेशमध्ये व्यवसायक करणे सुलभ जावे यासाठी येथील सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे उत्तर प्रदेश 12 व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, अशी माहिती सिद्धार्थनाथ सिंह यांनी दिली.

कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये रडार, इलेक्ट्रानिक्स व्हॉईल सिस्टिम, कॉकपीट डिसप्ले सिस्टिम, रफायलसाठी पॉवर जनरेशन सिस्टिमचे उत्पादन करण्यात येईल, असे थेल्स कंपनीचे भारतातील प्रमुख इमॅन्यूएल दी रॉकेफ्यूइल म्हणाले.

leave a reply