फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली – फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-येस ली द्रियान तीन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. मंगळवारपासून त्यांचा दौरा सुरू होणार असून ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण, हवामानबदल, स्थलांतरितांची अवागमन, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांमधील दोन्ही देशांची भागीदारी अधिक भक्कम करण्यावर यावेळी चर्चा होईल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्वच मुद्यांवर सखोल चर्चा होईल. यामध्ये धोरणात्मक भागीदारी व इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी दोन्ही देशांचे सहकार्य व क्षेत्रिय तसेच आंतरराष्ट्रीय समस्या यांचा समावेश असेल, असे फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध यामुळे अधिकच मजबूत होतील, असा दावा करण्यात येत आहे. तसेच फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री नवी दिल्लीतील रायसेना डायलॉग या सुरक्षाविषयक परिषदेत व्याख्यान देणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

उघड करण्यात आलेले नसले तरी भारत फ्रान्सकडून आणखी रफायल विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याबाबतच्या व्यवहाराची अद्याप अधिकृत पातळीवर घोषणा करण्यात आलेली नाही. पण भारत फ्रान्सकडून आणखी ३६ रफायल विमाने खरेदी करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याचवेळी भारताने १०८ लढाऊ विमानांच्या खरेदीवरही काम सुरू केले असून फ्रान्सची रफायल विमाने या कंत्राटासाठी प्रबळ दावेदार असल्याचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांची भारतभेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. याच्या बरोबरीने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्सच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी भारत अत्यंत महत्त्वाचा देश असल्याचे फ्रान्सकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘ला पेरूस’ या बंगालच्या उपसागरात पार पडलेल्या फ्रान्सच्या नौदल सरावासाठी या देशाचे रिअर ऍडमिरल फेयॉर्ड भारतात आले होते. भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश असल्याचे फ्रान्सचे असल्याचे फ्रेंच रिअर ऍडमिरल यावेळी म्हणाले होते. बंगालच्या उपसागरात क्वाड देशांबरोबर युद्धसराव करणारा फ्रान्स पुढच्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अधिक सक्रीय भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत यामुळे मिळाले होते.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात जवळपास दहा लाख फ्रेंचांची वस्ती असून त्यांचे संरक्षण ही फ्रान्सची जबाबदारी ठरते. त्यामुळे या क्षेत्रात फ्रान्सचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात भारताबरोबरील सहकार्य फ्रान्ससाठी अतिशय महत्त्वाचे ठरते, असा दावा फ्रान्सकडून केला जातो. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची अरेरावी फ्रान्स खपवून घेणार नाही आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा फ्रान्सकडून हिरिरीने पुरस्कार केला जाईल, असेही फ्रान्सने वेळोवेळी स्पष्ट केले होते.

leave a reply