कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाचा धोका ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला

- ‘एम्स’च्या संचालकांचा दावा

नवी दिल्ली – देेेशात कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. यामागे जनतेकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात दाखविण्यात येणारा हलगर्जीपणाबरोबर कोरोना नव स्ट्रेन कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे एका कोरोनाबाधीत व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या ८० ते ९० टक्के जणांना संसर्ग होत असल्याचा दावा, ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी केला आहे. तसेच सध्याची परिस्थिती सुधारली नाही, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडेल.

देेेशात कोरोनाचे संक्रमण फेब्रुवारी महिन्यात कमी झाले होते. यानंतर नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत हलगर्जीपणा वाढला. नागरिकांनी कोरोना साथीला गांभिर्याने घेणे सोडले. बाजार, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंटमध्ये पुन्हा गर्दी उसळली. ही बाब कोरोना विषाणूसाठी सूपर स्प्रेडर ठरल्याचे ‘ऑल इंडीया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (एम्स) संचालक डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेनही नव्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. याआधी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले ३० ते ४० टक्के जण हे कोरोनाबाधीत होत होते. थोडक्यात ६० ते ७० टक्के जणांना कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊनही या विषाणूचा संसर्ग होत नव्हता. पण आता कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात येणारे ८० ते ९० टक्के जण संक्रमित होत असून यामुळे कुटुंबच्या कुंटुबांना संसर्ग झाल्याचे पहायला मिळत आहे, असे गुलेरिया म्हणाले.

आता राज्य सरकारांना झपाट्याने निर्णय घेऊन बेडची संख्या वाढवावी लागेल. काही हॉटेल्सनाही रुग्णालयांमध्ये बदलावे लागेल. जणेकरून कोरोनाबाधीतांचे विलगीकरण करता येईल. वेळ कमी असून झपाट्याने निर्णय घ्यावे लागतील. नाहीतर आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढून ती कोलमडेल, अशी भिती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशात रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंत कोरोनाचे १ लाख ६९ हजार इतके नवे रुग्ण आढळले. हा चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक ठरला. यामुळे देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३५ लाख २७ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. याबाबतीत भारताने ब्राझिलला मागे टाकले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या देशांमध्ये भारत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. जगभरात आतापर्यंत कोरोनाचे १३ कोटी ६१ लाख ३७ हजार रुग्ण आढळले आहेत. यातील अमेरिकेत तीन कोटी १२ लाख रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. सोमवारी महाराष्ट्रात सुमारे ५२ हजार अधिक नवे रुग्ण आढळले, तसेच २५८ जणांचा बळी गेला.

leave a reply