येत्या सहा महिन्यात इंधनाच्या दरात वाढ होईल

- गोल्डमन सॅचचा दावा

टेक्सास – पुढच्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाची मागणी वाढेल आणि त्यामुळे इंधनाचे दरही वधारतील. हे दर ८० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचतील, असा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध अमेरिकन वित्तसंस्था ‘गोल्डमन सॅच’ने केला आहे. काही दिवसांपूर्वी गोल्डमन सॅचने तांबे हा धातू म्हणजे येत्या काळातील नवे इंधन ठरेल, असा दावा केला होता.

गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वच व्यवहार मंदावले आहेत. याचा परिणाम इंधनाच्या मागणीवरही झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे सध्या कच्च्या तेलाचे दरही ६४.७३ डॉलर्स प्रति बॅरल इतके आहेत. गेल्या आठवड्याभरात यामध्ये जवळपास तीन डॉलर्सची वाढ झाली आहे. पण येत्या जागतिक काळात परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे अमेरिकन वित्तसंस्थेचे म्हणणे आहे.

सध्या बहुतांश देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. येत्या काळात या लसीकरणाचे प्रमाण वाढल्यानंतर पर्यटन आणि व्यापारी वाहतूकही वाढेल. असे झाल्यास जगभरात इंधनाच्या मागणीत मोठी वाढ होईल, असा दावा सदर वित्तसंस्थेने केला. पुढच्या सहा महिन्यात ही मागणी प्रतिदिन ५२ लाख बॅरेल्सवर जाऊ शकते, असेही या वित्तसंस्थेने म्हटले आहे.

इंधनाची मागणी इतकी वाढेल इंधनउत्पादक देशांकडून पुरवठा देखील कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे इंधनाच्या दरात वाढ होऊन हे दर ८० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात, असा दावा अमेरिकी वित्तसंस्थेने केला. या महिन्याच्या सुरुवातीलाही गोल्डमन सॅचने इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक प्लस’ संघटनेला इंधनाची उत्पादकता वाढविण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी याच वित्तसंस्थेने तांबे हे भविष्यातील इंधन ठरेल, असे म्हटले होते. २०३० सालापर्यंत जगभरातील तांब्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढेल. गेल्या वर्षी जगभरात १० लाख टन तांब्याचे उत्खनन झाले होते. पण येत्या काळात हेच प्रमाण ५४ लाख टनपर्यंत पोहोचू शकते, असा दावाही या वित्तसंस्थेने केला होता.

leave a reply