पर्शियन आखातात प्रवेश नाकारून इराणने अमेरिकेचे हात छाटले

- इराणी संसदेच्या सभापतींचा दावा

तेहरान – ‘अमेरिकेच्या गस्तीजहाजांना पर्शियन आखातात प्रवेश नाकारून इराणने अमेरिकेचे हात छाटले आहेत. इराणने अशीच आक्रमकता दाखविली तर अमेरिकी नौदलाला या क्षेत्रात कधाही प्रवेश मिळणार नाही आणि अमेरिकेच्या हालचालींचा या क्षेत्रावर परिणामही होणार नाही’, अशी घोषणा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर घलिबाफ यांनी केली. त्याचबरोबर या क्षेत्रातील इतर देशांनीही अमेरिकेच्या विरोधातील या कारवाईसाठी इराणला साथ द्यावी, असे आवाहन घलिबाफ यांनी केले. दोन दिवसांपूर्वी पर्शियन आखातात इराणच्या गस्तीनौकांनी अमेरिकेच्या गस्तीजहाजांजवळून धोकादायक प्रवास केला होता. त्यानंतर घलिबाफ यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

सोमवारी पर्शियन आखाताच्या उत्तरेकडील भागात गस्तीसाठी रवाना झालेल्या अमेरिकी नौदलाच्या ‘युएससीजीसी बॅरानॉफ’ या जहाजापासून इराणच्या गस्तीनौकेने अवघ्या ६२ मीटर अंतरावरुन प्रवास केला होता. थोड्यावेळानंतर इराणच्या तीन गस्तीनौकांनी अमेरिकन विनाशिकेच्या बाजूने प्रवास केला होता. त्यानंतर अमेरिकेला वॉर्निंग शॉट्स डागून इराणी नौकांना इशारा द्यावा लागला होता. अमेरिकेच्या नौदलाने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला तसेच आपल्या गस्तीजहाजांच्या जवळून इराण धोकादायकरित्या प्रवास करीत असल्याची टीका केली होती.

यावर इराणच्या संसदेचे सभापती आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार घलिबाफ यांनी निराळाच दावा केला आहे. इराणच्या गस्तीनौकांनी पर्शियन आखाताच्या उत्तरेकडे जाणार्‍या अमेरिकी जहाजांचा मार्ग रोखल्याचे घलिबाफ यांनी म्हटले आहे. आपल्या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी इराणच्या नौदलाने हे पाऊल उचलले असून यापुढेही अशी कारवाई केली जाईल, असा इशारा घलिबाफ यांनी दिला. ‘अमेरिका व परदेशी युद्धनौकांच्या तैनातीमुळे या क्षेत्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परदेशी जहाजांमुळे या क्षेत्राला असलेला धोका आणि असुरक्षितता वाढली आहे. आता परदेशी जहाजे हुसकावून लावण्यासाठी या क्षेत्रातील देशांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे’, असे आवाहन घलिबाफ यांनी केले.

इराणच्या संसदेचे सभापती असलेले मोहम्मद बाघेर घलिबाफ हे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे माजी अधिकारी होते. गेल्या वर्षी अमेरिकेच्या हवाईहल्ल्यात मारले गेलेले इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांचे सहकारी आणि कट्टरपंथी नेते म्हणून घलिबाफ यांच्याकडे पाहिले जाते. २०१७ सालच्या इराणमधील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत रोहानी यांच्या विरोधात घलिबाफ यांनी उमेदवारी दाखल केली होती. रिव्होल्युशनरी गार्ड्सचा पाठिंबा असलेले घलिबाफ यंदाच्या निवडणुकीतही उमेदवारी दाखल करण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या तीन आवड्यांपासून व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, निर्बंध शिथिल करण्याबाबत बायडेन प्रशासनाने दिलेला प्रस्ताव इराणने नाकारल्याच्या बातम्या इराणी माध्यमांमध्ये येत आहे. अशावेळी पर्शियन आखातात अमेरिकेच्या गस्तीजहाजाजवळून प्रवास करून इराणने बायडेन प्रशासनाला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply