एक्सोस्केलेटन्स, रोबोटिक्स, ड्रोन्सचा समावेश असलेले ‘फ्यूचर सोल्जर’ विकसित करण्यासाठी रशियाची जोरदार तयारी

‘फ्यूचर सोल्जर’मॉस्को – एक्सोस्केलेटनचे चिलखत, रोबोटिक्स, मिनी-मायक्रो ड्रोन्स आणि अत्यंत प्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या फ्यूचर सोल्जर कार्यक्रमावर रशियाने वेगाने काम करीत आहे. यामुळे जवानांच्या युद्धकौशल्यात वाढ होईल, असा दावा रशियन लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला. गेल्या दोन वर्षात एका मिनिटासाठीही हा कार्यक्रम थांबलेला नाही, अशा शब्दात एका रशियन अधिकार्‍याने याचे महत्त्व अधोरेखित केले.

गेल्या दशकभरापासून रशियाने अतिप्रगत संरक्षण साहित्य व तंत्रज्ञान निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यातील युद्धासाठी आपल्या जवानांना सज्ज करण्यासाठी रशियाने ‘रॅट्निक’ नावाचा कार्यक्रम राबविला आहे. याच्या अंतर्गत संरक्षण साहित्याच्या निर्मितीतील आघाडीच्या रशियन कंपन्या सहभागी झाल्या असून रॉस्टेक कंपनी फ्यूचर सोल्जर अर्थात भविष्यातील रशियन जवानांसाठी आवश्यक साहित्यांची निर्मिती करीत आहे.

रॉस्टेकच्या ‘सेंट्रल सायन्टिफिक रिसर्च इन्स्टिट्युट फॉर प्रिसिजन मशिन इंजिनिअरिंग-टि्सनीटॉशमॅश’ या उपकंपनीने रॅट्निक कार्यक्रमांतर्गत एक्सोस्केलेटन्स, रोबोटिक्सची निर्मिती करीत आहे. क्रास्नाया जेज्दा या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना रशियन लष्कराचे वरिष्ठ अधिकारी जनरल ओलेग साल्यूकोव्ह यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर मिनी व मायक्रो ड्रोन्सची निर्मिती देखील सुरू असल्याचे जनरल ओलेग यांनी सांगितले. जनरल ओलेग हे रशियन ग्राउंड फोर्सेसचे सध्याचे प्रमुख आहेत.

‘फ्यूचर सोल्जर’गेल्या काही वर्षांमध्ये रॅट्निक कार्यक्रमात सातत्याने बदल केले असून भविष्यातील रशियन सैनिकाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जनरल ओलेग म्हणाले. यासाठी रशियन जवान वापरत असलेली प्रगत दर्जाची ‘एके-७४’ असॉल्ट रायफलच्या ऐवजी कलाश्‍निकोव्ह कंपनीचीच ‘एके-१२’ ही अत्यंत प्रगत रायलफ देण्यात येत आहे. एका मिनिटात सहाशे ते साडेसहाशे गोळ्या झाडण्याची क्षमता या रायफलमध्ये आहे. याशिवाय रशियन जवानांसाठी थर्मल आणि नाईट-व्हिजनने सज्ज असलेले हेल्मेट तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा विकसित केली जात आहे.

रशियाने आत्तापर्यंत सुमारे ३००,००० रॅट्निक एक्सोस्केलेटन्स जवानांना पुरविले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान करणार्‍या रशियन जवानांचा नेम अचूक असेल, असा दावा रशियन कंपनी करीत आहे. त्याचबरोबर वजनदार साहित्य घेऊन मैलोनमैल पायपीट करणे किंवा डोंगरदर्‍या पार करणे रशियन जवानांसाठी सोपे ठरेल. सामान्य जवानांपेक्षा एक्सोस्केलेटन्स घातलेले जवान वेगवान आणि सामर्थ्यशाली असतील, असा दावा रशियन लष्करी अधिकारी करीत आहेत.

याआधी अमेरिका, ब्रिटन, चीन देखील या एक्सोस्केलेटन चिलखत व रोबोटिक्स जवानांवर संशोधन करीत असल्याचे उघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी एक्सोस्केलेटन्स घातलेले चीनचे जवान तिबेटमधील डोंगर पार करतानाचा व्हिडिओ चिनी मुखपत्राने प्रसिद्ध केला होता.

leave a reply