शत्रूदेशांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन सायबर हल्ले चढविण्याची क्षमता विकसित करणार

क्षमता विकसितलंडन – ब्रिटनवर अद्याप मोठी आपत्ती ठरेल, असा सायबरहल्ला झालेला नाही. मात्र असा हल्ला झाल्यास त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास सरकार सज्ज नसेल, तर तो आमच्या कर्तव्याचा भंग ठरेल, अशा शब्दात ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी ब्रिटन नजिकच्या काळात आक्रमक सायबरहल्ल्यांची मोठी क्षमता विकसित करेल, असा दावा केला. ब्रिटनने गेल्या वर्षी ‘नॅशनल सायबर फोर्स’ची घोषणा केली असून त्याचे मुख्यालय लँकेशायरमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रिटन पाच अब्ज पौंडाची गुंतवणूकही करणार आहे. संरक्षणमंत्री बेन वॉलेस व परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी याची माहिती दिली.

‘काही परदेशी राजवटी दररोज ब्रिटनविरोधात सायबरयुद्धाचा वापर करीत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार या युद्धाविरोधात बचाव करण्याचा ब्रिटनला पूर्ण अधिकार आहे. हे युद्ध धोकादायक व हानी पोहोचविणारे असेल तर ब्रिटन पूर्ण क्षमतेने आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करेल. आक्रमक सायबरहल्ला हा त्याचाच एक भाग असेल. ब्रिटनमधील गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी व त्यांचे नेटवर्क याबरोबरच सायबरहल्ले करणार्‍या शत्रुदेशांवरही हल्ले चढविले जातील’, असे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी बजावले. सायबरहल्ले ही युद्धातील नवी आघाडी असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

क्षमता विकसित‘ब्रिटनवर अद्याप मोठा सायबरहल्ला झालेला नाही. मात्र पुढील २० वर्षात काय होऊ शकते, याची आपल्याला कल्पना नाही’, अशा शब्दात संरक्षणमंत्री वॉलेस यांनी आक्रमक सायबरहल्यांच्या क्षमतेचे समर्थन केले. या माध्यमातून ब्रिटन सायबरहल्ल्याचे मूळ असणार्‍या नेटवर्कवर तसेच परदेशी राजवटीच्या संवेदनशील क्षेत्रावरही प्रतिहल्ले चढवू शकेल, असा दावाही त्यांनी केला. संरक्षण विभाग व ‘जीसीएचक्यू’ यंत्रणा संयुक्तरित्या नॅशनल सायबरफोर्सची जबाबदारी सांभाळणार आहेत. येत्या काही वर्षात ‘ऑफेन्सिव्ह सायबरअटॅक’ क्षेत्रात ब्रिटन जगातील आघाडीच्या देशांपैकी एक असेल, असेही ब्रिटीश संरक्षणमंत्री म्हणाले.

‘ब्रिटनचा नॅशनल सायबरफोर्स परदेशी शक्तींच्या आक्रमक वर्तनाला वेसण घालण्यासाठी उपकारक ठरेल. ब्रिटीश जनतेच्या सुरक्षेसाठी ब्रिटन भविष्यातील संरक्षणक्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक करीत आहे. ब्रिटनच्या मित्रदेशांना असणार्‍या धोक्याविरोधातही त्यांना सहाय्य करण्यात येईल. नवे मुख्यालय व गुंतवणूक सहकारी देशांसह शत्रुदेशांसाठीही महत्त्वाचा संदेश ठरतो’, असे परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस पुढे म्हणाले.

ब्रिटनच्या नॅशनल सायबरफोर्समध्ये हजारो सायबरतज्ज्ञांचा समावेश असणार आहे. त्यात संरक्षण विभाग, ‘जीसीएचक्यू’, ‘एमआय६’ व ‘डिफेन्स सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी’मधील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. यापूर्वी ब्रिटनच्या सरकारने रशियाकडून होणार्‍या सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या वर्षी कोरोना लसीची माहिती चोरण्यासाठी झालेल्या सायबरहल्ल्यांदरम्यानही ब्रिटनने रशियावर उघड आरोप केले होते. त्यापूर्वी रशियाची हेरगिरी व इतर कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनने रशियन नेते व यंत्रणांवर सायबरहल्ले चढविण्याची योजना आखल्याचे वृत्तही समोर आले होते.

leave a reply