गडचिरोलीमध्ये गडकरी यांच्या हस्ते ७७७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्‌घाटन

गडचिरोली – रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ७७७ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग विकासकामांचे उद्‌घाटन केले. याअंतर्गत तीन पूल उभारले गेले असून दोन रस्त्यांचा विकास केला गेला आहे. यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणाला जोडला गेला, असे गडकरी यांनी म्हटले. तर विकासकामांमुळे या भागातील नक्षली प्रभाव कमी होईल, असा विश्वास रस्ते विकास आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी व्यक्त केला.

७७७ कोटी

रविवारी नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून निजामाबाद ते जगदलपुर महामार्गावरील प्राणहिता नदीवरचा ८५५ मीटर पूल, इंद्रावती नदीवरील ६३० मीटरचा पूल, लंकाचेन राज्य महामार्गावरील ३० मीटरवरील पूल आणि इतर दोन रस्त्याच्या कामांचे उद्‌घाटन केले. या व्यतिरिक्त वाईगंगा, बांडिया, पेरमिली, पर्लकोटा या प्रमुख नद्यांवरील पुलांची पायाभरणी केली.

निजामाबाद-जगदलपूर महामार्गाचे काम करताना इंजिनिअर्सना माओवाद्यांच्या कारवायांचा त्रास सहन करावा लागला. पण त्याकडे दुर्लक्ष करुन इंजिनिअर्सने काम पूर्ण केले. तर इंद्रावती नदीवरच्या पुलाचे काम करताना इंजिनिअर्स आणि कामगारांच्या रक्षणासाठी खास पोलीस स्टेशन उभारावे लागले होते. तसेच नैसर्गिक आव्हाने देखील होती. या सर्व संकटाचा सामना करुन इंजिनिअर्स आणि कामगारांनी ही कामे केली, हे सांगून गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले.

७७७ कोटी

जवळपास २५ वर्षानंतर गडचिरोलीमधले हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगून गडकरी यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. पुढच्या काळात गडचिरोलीमध्ये अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे येत्या दोन वर्षात गडचिरोलीचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच या विकासकामांमुळे गडचिरोलीमधल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील. या जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल. इथल्या नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीमध्ये पायाभूत सुविधांचे प्रमाण वाढत गेले तर इथला माआओवाद्यांचा प्रभाव कमी होईल, असा विश्वास जनरल व्ही.के. सिंग यांनी व्यक्त केला दरम्यान, गडकरी यांनी गडचिरोलीच्या देसाईगंजपासून चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले.

leave a reply