पाकिस्तानच्या विरोधात सिंधी, बलोच, पश्तूंची जगभरात निदर्शने

लंडन/ वॉशिंग्टन – ”पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ दहशतवादी आहे”, ‘पाकिस्तानच्या लष्कराने बलोचींचा नरसंहार थांबवावा’ अशा आशयाचे फलक घेऊन सिंधी, बलोच आणि पश्तूंनी पाकिस्तानविरोधात अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये जोरदार निदर्शने केली. ‘जगाच्या नकाशावर पाकिस्तानचे अस्तित्व असेपर्यंत आपली ही निदर्शने सुरूच राहतील’, असा इशारा या निदर्शनकर्त्यांनी दिला. पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या अत्याचाराकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधावे, या हेतूने ही निदर्शने काढण्यात आली. कॅनडातील पाकिस्तानविरोधी या निदर्शनांमध्ये चीनविरोधी ‘फ्री हाँगकाँग’ मोहीमेचे निदर्शक देखील सहभागी झाले.

पाकिस्तानच्या विरोधात सिंधी, बलोच, पश्तूंची जगभरात निदर्शने‘इंटरनॅशनल डे ऑफ द विक्टीम्स ऑफ एनफोर्स डिसॲपरन्स’ निमित्ताने बलोच, सिंधी आणि पश्तूंनी पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवला. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानाबाहेर ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’ने केलेल्या निदर्शनांच्या बातम्या युरोपिय माध्यमांमध्ये चर्चेत होत्या. पाकिस्तानचे लष्कर बलोचिस्तानमधून हजारो जणांचे अपहरण आणि हत्या करतात, याकडे निदर्शनकर्त्यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराने बलोचिस्तानमध्ये ‘हयात बलोच’ या विद्यार्थ्याची त्याच्या आईसमोरच हत्या केली. त्यानंतर बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. लंडनमधल्या निदर्शनात ‘हयात बलोच’च्या हत्येसाठी जबाबदार असणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली.

पाकिस्तानच्या विरोधात सिंधी, बलोच, पश्तूंची जगभरात निदर्शनेआंतरराष्ट्रीय समुदायाने आणि ब्रिटनने पाकिस्तानला सहाय्य करणे थांबवावे व ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यात लक्ष घालावे, असे कळकळीचे आवाहन या निदर्शनकर्त्यांनी केले. तर कॅनडाच्या टोरांटो शहरात ‘बलोच नॅशनल मुव्हमेंट’, ‘कॅनडा पश्तू कौन्सिल’, ‘पश्तू तहफुज मुव्हमेंट’ आणि ‘वर्ल्ड सिंधी कॉग्रेंस’ने पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ बलोच आणि सिंधीवर करीत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ बलोचिस्तानमधल्या राजकीय नेते, पत्रकार, सामान्य जणांचे अपहरण करीत असल्याचा आरोप करण्यात आला. फक्त बलोचिस्तानच नाही तर इतर प्रांतामध्येही आता तीच गत झाली आहे, असे सांगून आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर पावले उचलायलाच हवी अशी मागणी निदर्शकांनी केली.

या प्रकरणी पाकिस्तानमध्ये मीडिया ब्लॉकआऊट आहे. माध्यमांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांची बातमी देताना पत्रकार घाबरतात, असे एका पत्रकारानेच म्हटले. पाकिस्तान इतके चीनही बलोचिस्तानमधल्या नरसंहाराला जबाबदार आहे. चीनचे लष्कर, पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ या तिघांचा यात समान सहभाग असल्याचा आरोप आणखी एका निदर्शकाने केला. तर, अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शकांनी पाकिस्तान सरकार, लष्कर आणि आयएसआय’च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘पाकिस्तान बलोच, सिंधी, पश्तूंसाठी तुरुंग बनला आहे’, असा आरोप यावेळी करण्यात आला.

पाकिस्तानच्या विरोधात सिंधी, बलोच, पश्तूंची जगभरात निदर्शनेदरम्यान, ‘जे सिंध मुत्ताहिदा महाज’ या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ बलोचिस्तान आणि सिंधमध्ये करीत असलेल्या अत्याचार, नरसंहार, विध्वंस याविरोधात कडाडून टीका केली. गेली ७० वर्ष पाकिस्तान बलोचिस्तान, सिंधमध्ये १६ वर्षाच्या मुलापासून ७० वर्षाच्या नागरिकांवर करीत असलेल्या अमानुष छळाकडे बुराफत यांनी लक्ष वेधले. अगदी महिला आणि मुलांनाही ते सोडत नाही, असे सांगून बुराफत यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

‘जगभरात लाखोंचे अपहरण केले जाते. पण चीन आणि पाकिस्तानमध्ये अपहरण होण्याचे कारण अत्यंत वेगळे असते. त्यामागे राजकीय कारणे असतात. दहशतवादी पाकिस्तान क्रूरपणे बलोची आणि सिंधीचा छळ करीत आहे. चीनमध्ये उघुरांचा जसा छळ केला जातो, त्याच धर्तीवर पाकिस्तान बलोच आणि सिंधी तरुणांचा छळ करते. पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’चे सिक्रेट टॉर्चर सेल आहे’, असे सांगून बुराफत यांनी पाकिस्तानच्या अत्याचारांचा पाढा वाचला. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या या क्रूरतेविरोधात कडक पावले उचलावीत, असे आवाहन बुराफत यांनी यावेळी केले.

leave a reply