लष्करी अधिकार्‍यांच्या चर्चेची नवी फेरी सुरू होण्याआधी भारतीय लष्करप्रमुखांची चीनला समज

चीनला समजनवी दिल्ली – रविवारी लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चा सुरू होत आहे. याच्या आधी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी चीनला समज दिली. जर लडाखच्या एलएसीवर चीनचे लष्कर ठाण मांडून बसणारच असले, तर भारतीय सैन्यही तसेच करील, असे जनरल नरवणे यांनी बजावले. तसेच एलएसीजवळील चीनची तैनाती व हालचाली हा अजूनही चिंतेचा विषय ठरतो, असे सांगून जनरल नरवणे यांनी एलएसीवरचा तणाव अजूनही कायम कमी झालेला नाही, याची आठवण करून दिली.

गेल्या काही आठवड्यांपासून चीनने एलएसीवरील आपल्या चिथावणीखोर हालचालींमध्ये वाढ केल्याचे दिसते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस उत्तराखंडच्या बाराहोटी येथील एलएसीमध्ये घुसखोरी करून इथल्या एका पुलाची मोडतोड करण्याचा प्रयत्न चीनच्या जवानांनी केला होता. तर दहा ते बारा दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील यांगत्से येथील एलएसीवर चीनचे शेकडो जवान घुसखोरी करण्याच्या तयारीत असतानाच, भारतीय सैन्याने त्यांना रोखले होते. यावेळी झालेल्या झटापटीत भारतीय सैन्याचे काहीच नुकसान झाले नाही, मात्र चीनच्या जवानांना चांगलीच अद्दल घडली, असे दावे माध्यमांनी केले आहेत. याचे तपशील उघड झाले नसले तरी लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू होण्याआधी चीन आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी जोरदार धडपड करीत असल्याचे यातून समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर, एका कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी चीनला पुन्हा एकदा समज दिली. एलएसीवर चीनने मोठ्या प्रमाणात तैनाती करून ठेवलेली आहे. हा चिंतेचा विषय ठरतो. लडाखच्या एलएसीवरील तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी इथली समस्या संपलेली नाही. मात्र चीनचे लष्कर लडाखच्या एलएसीवर ठाण मांडून बसणारच असेल, तर भारतीय सैन्य देखील तसेच करील, असा इशारा यावेळी लष्करप्रमुखांनी दिला. हिवाळा सुरू होण्याच्या आधी भारतीय लष्करप्रमुखांनी चीनला दिलेला हा इशारा म्हणजे धोरणात्मक पातळीवरील खरमरीत संदेश ठरतो.

गेल्या वर्षी भारतावर दडपण वाढविण्यासाठी चीनच्या लष्कराने लडाखच्या एलएसीवर तैनाती कायम ठेवली खरी. पण इथल्या कडक हिवाळ्याची सवय नसलेले चीनचे जवान इथे सतत आजारी पडत होते. त्यांच्यावर उपाचर व त्यांची देखभाल यासाठी चीनला बरेच परिश्रम करावे लागले. इतकेच नाही तर या क्षेत्रात तैनात केलेले चीनचे अधिकारी इथले हवामान सहन न होऊन दगावल्याची बातमी आली आहे. तर त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या दुसर्‍या अधिकार्‍याची प्रकृती खालावल्याची माहिती उघड झाली आहे. अशा परिस्थितीत लडाखच्या एलएसीवरून माघार घेणे ही चीनसाठी सर्वात महत्त्वाची बाब ठरते. मात्र यामुळे भारतासमोर आपली मानहानी होईल व ही अप्रतिष्ठा टाळण्यासाठी चीन इथे तैनात असलेले आपले जवान मागे घेण्यास तयार नाही.

म्हणूनच भारतीय सैन्य लडाखच्या एलएसीवर ठाण मांडून राहू शकते, पण चीनच्या लष्कराकडे तशी क्षमता नाही, याने चीनची फार मोठी हानी होईल, ही बाब भारतीय लष्करप्रमुख चीनच्या लक्षात आणून देत आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही एका हिवाळ्यातून आपण दुसर्‍या हिवाळ्यात प्रवेश करीत आहोत, असे चीनला हुडहुडी भरविणारे सूचक उद्गार काढले आहेत. चीनने भारताबरोबरील करारांचे उल्लंघन करून लडाखच्या एलएसीवर घुसखोरी केलेली आहे, यात वाद नाही. पण आपल्या सीमेची सुरक्षा करण्याच्या वज्रनिर्धार व क्षमता याची भारताकडे कमतरता नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले. नेमक्या याच गोष्टींची कमतरता चीनच्या लष्कराला भासत आहे. लडाखच्या हवामानात टिकून राहण्यासाठी लागणारी शारीरीक क्षमता व उच्चकोटीचे मनोबल चीनच्या लष्कराकडे नाही. ही बाब परराष्ट्रमंत्री जयशंकर राजनैतिक भाषेत स्पष्ट करीत आहेत.

चीनने अशारितीने लडाखच्या एलएसीजवळ इतकी मोठी लष्करी तैनाती कशासाठी केली, ते कळायला मार्ग नाही. ही बाब अनाकलनीय ठरते, असे लष्करप्रमुख व परराष्ट्रमंत्र्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात म्हटले होते. चीनच्या या तैनातीमागे भारतीय सैन्याची भीती असावी, असा संकेत लष्करप्रमुख जनरल नरवणे व परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या विधानांमधून दिला जात आहे.

leave a reply