अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला सज्जड इशारा

इस्लामाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लवकरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करतील, असा दिलासा अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांनी दिला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांच्या फोनकॉलची मोठ्या आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत फोन करण्याचे टाळून आपली मानहानी केल्याचा समज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करून घेतला असून हा पाकिस्तानातही थट्टेचा विषय बनला आहे. मात्र बायडेन फोन करतील, या आश्‍वासनाच्या पलिकडे अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांच्या दौर्‍यातून पाकिस्तानला दुसरे काहीही मिळालेले नाही.

अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला सज्जड इशारातालिबानने अमेरिकेबरोबर चर्चेत दिलेली आश्‍वासने पाळण्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्रभावाचा वापर करायला हवा. ही बाब सर्वांच्याच हिताची ठरेल, असा नेमक्या शब्दात उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांनी पाकिस्तानला खडसावले. त्याचवेळी दहशतवाद्यांचा सुळसुळाट असलेल्या अफगाणिस्तानपासून सर्वांनाच धोका संभवतो, याचीही परखड जाणीव वेंडी शर्मन यांनी करून दिली. तसेच मजबूत लोकशाही असलेला पाकिस्तान अमेरिकेला अपेक्षित आहे, असे विधान करून पाकिस्तानच्या सध्याच्या अवस्थेवर उपपरराष्ट्रमंत्री शर्मन यांनी नेमके बोट ठेवले. पुढच्या काळातही दहशतवादप्रतिबंधक कारवायांवर अमेरिका पाकिस्तानशी चर्चा करीत राहणार असल्याचे उपपरराष्ट्रमंत्री शर्मन पुढे म्हणाल्या.

वेंडी शर्मन पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर, त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली. मात्र याचे तपशील माध्यमांसमोर उघड करण्यात आलेले नाही. या चर्चेत अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला चांगलेच खडसावले असावे व म्हणूनच पाकिस्तान याची माहिती उघड करायला तयार नसल्याचा दावा काही पत्रकारांनी केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला चढविण्यासाठी अमेरिकेला हवाई हद्द व तळ दिला नाही, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, हे बजावण्यासाठीच अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री पाकिस्तानात आल्या आहेत, असे दावे पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत.

पाकिस्तानात येण्याच्या आधी भारताचा दौरा करणार्‍या शर्मन यांनी भारताबरोबर पाकिस्तानवरील कारवाईबाबत चर्चा केल्याचे पाकिस्तानच्या माध्यमांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी काश्मीरबाबत भारताला अनुकूल असलेली विधाने केली आहेत. तसेच भारत व पाकिस्तान हे वेगळे देश असून भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार देश असल्याचे शर्मन यांनी ठासून सांगितले होते. हे सारे पाकिस्तानला इशारा देण्यासाठीच होते, असे काही पाकिस्तानी पत्रकारांनी म्हटले आहे.

leave a reply