जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ भारताच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली – ‘जर्मनीला भारताबरोबरील सहकार्य अधिक दृढ करायचे आहे. भारत व युरोपिय महासंघामध्ये मुक्त व्यापारी करार लवकरात लवकर संपन्न व्हावा, यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे’, असे जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी जाहीर केले. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या चॅन्सेलर शोल्झ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद संबोधित केली. यावेळी बोलताना जर्मनी व भारताच्या सहकार्याचे महत्त्व चॅन्सेलर शोल्झ यांनी अधोरेखित केले.

German Chancellor Scholzयुक्रेनच्या युद्धाला वर्ष पूर्ण झाले असून त्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलरांनी भारताचा दौरा केला, ही लक्षणीय बाब ठरते. चॅन्सेलर शोल्झ यांच्या या दौऱ्यात युक्रेनच्या युद्धाबाबत भारताशी महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित असल्याचा दावा जर्मनीच्या माध्यमांनी केला. युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारत फार मोठे योगदान देऊ शकतो, असे अमेरिका व फ्रान्स या देशांनी म्हटले होते. जर्मनी देखील यासाठी प्र्रयत्न करीत असल्याचे संकेत चॅन्सेलर शोल्झ यांच्या या दौऱ्यातून मिळत आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान, युक्रेनच्या युद्धामुळे फार मोठी आव्हाने समोर ठाकलेली असताना, युरोपातील इतर प्रमुख देशांबरोबरच जर्मनीने देखील भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः भारतीय नौदलाला सहा पाणबुड्या पुरविण्यासाठी जर्मनी उत्सुक असून सुमारे पाच अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कमेचे हे कंत्राट मिळविण्यासाठी जर्मनी धडपडत असल्याचे दिसते. चॅन्सेलर शोल्झ यासंदर्भात भारताला प्रस्ताव देणार असल्याची चर्चा त्यांच्या दौऱ्याच्या आधीच सुरू झाली होती.

भारताबरोबर व्यापार, संरक्षण, आयटी इत्यादी क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी जर्मनी विशेष प्रयत्न करील, अशी ग्वाही यावेळी शोल्झ यांनी दिली. याबरोबरच भारत व युरोपिय महासंघामधील मुक्त व्यापारी करार लवकरात लवकर संपन्न व्हावा, यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे चॅन्सेलर शोल्झ म्हणाले. युरोपिय महासंघातून बाहेर पडलेल्या ब्रिटनची भारताशी मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. लवकरच हा करार संपन्न होईल, असे दावे केले जातात. त्या पार्श्वभूमीवर, युरोपातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीकडून महासंघ व भारतामधील व्यापारी करारासाठी घेण्यात येत असलेला हा पुढाकार महत्त्वाचा ठरतो.

भारत व जर्मनीचा वार्षिक द्विपक्षीय व्यापार २४ अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. जर्मनी हा युरोपातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. तसेच भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये जर्मनीचाही समावेश आहे. सध्या १८०० जर्मन कंपन्या भारतात कार्यरत आहेत, याचा दाखला देऊन भारतातील गुणवत्ता व कुशल मनुष्यबळ यांचा जर्मनीलाही लाभ घ्यायचा आहे, असे चॅन्सेलर शोल्झ यांनी स्पष्ट केले. तर दहशतवाद व विघटनवादाच्या विरोधातील लढ्यात भारत व जर्मनी एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

leave a reply